Last Updated on 18 Feb 2025 9:05 PM by Sanjay Patil/Adhorekhit
⏩ नियतीने लादलेलं राजकारण जयंतरावांनी कर्तृत्वाने जिंकलं
⏩ मैत्रीपेक्षा मोठं काही नाही, जयंतासारखा मित्र लाभणं हे भाग्य!
⏩ समाजासाठी काम करत राहिल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नाही
⏩ आयबीएफच्या प्रयत्नांनी अनेकांना व्यवसायाची नवी दिशा
सांगली : एकमेकांना मदत करून समाज उभारणीचे काम जे ‘आयबीएफ’ने हाती घेतले आहे, ते खूप मोठे आहे. त्यांनी त्यात सातत्य ठेवावे, असे आवाहन सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी इस्लामपूर येथे केले. जेव्हा आपले नाव होते, तेव्हा आपली म्हणून जी जबाबदारी आहे त्याचे भान ठेवावेच लागेल. भवतालाचे भले करण्यासाठी काम केले तर काही कमी पडत नाही,असेही ते म्हणाले.
इस्लामपूर बिझनेस फोरम (आयबीएफ) तर्फे येथील आ.जयंतराव पाटील खुले नाट्यगृहात आयोजित बिझनेस एक्स्पो २०२५ या व्यावसायिक प्रदर्शनाच्या उदघाटन समारंभात ते बोलत होते. आ. जयंतराव पाटील अध्यक्षस्थानी होते. आयबीएफचे संस्थापक प्रतिकदादा पाटील,मुख्य प्रायोजक वाय फाय डब्बाचे मार्केटिंग हेड उत्सव कुमार,अध्यक्ष विकास राजमाने प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी उद्योजक किशोर राठी, श्रीकांत पाटील,मोहन जाधव यांचा सत्कार करण्यात आला. वाय फाय डब्बा डॉट कॉम च्या रौटर्सचे अनावरण करण्यात आले.
नियतीने लादलेलं राजकारण जयंतरावांनी कर्तृत्वाने जिंकलं
नाना पाटेकर म्हणाले, जयंता आणि माझी मैत्री जुनी आहे आणि ही मैत्री असणे आनंद दायी आहे. जयंताचे वाईट गोष्टीशी कधीच नाव जोडले गेले नाही आणि पुढेही शक्यता नाही, याची खात्री आहे. नियतीने लादलेले राजकारण जयंताने यशस्वी करून दाखवले आहे. प्रतीकने जो आयबीएफचा पसारा मांडला आहे, हे कठीण काम आहे. त्याच्या क्षेत्रात तो उद्या मोठे यश मिळवेल, पण त्यासाठी त्याला सातत्य ठेवावे लागेल. आपण माणसं कशी जोडतो हे महत्त्वाचे आहे. कोणाला त्रास न देता आनंद मिळवणे हे छान आहे. पैशांचा संचय किती करायचा? करायचा तर माणसांचा करूयात. पैशाचा नको. ‘नाम’ फाउंडेशनमध्ये अनेकजण सोबत येत आहेत. यावेळी एक हजार गावांमध्ये काम सुरू करत आहोत. पूर्वी दुष्काळी भाग असणारे गाव यावेळी बागायती घोषित झाल्याचा आनंद होतोय. जयंत कोणत्या पक्षात आहे यापेक्षा तो मित्र आहे हे महत्त्वाचे आहे. मला इकडे सांगलीत घर घेण्याची गरज नाही कारण तू इकडे आहेस. जे करताय त्यात सातत्य टिकवणे गरजेचे आहे, त्यामुळे नव्याने माणसे जोडली जातात. खरं बोललं की लक्षात ठेवावं लागतं नाही. खरं बोलण्याचे परिणाम भोगण्याची तयारी ठेवायची.

ज्याची भीती वाटते ते करायचं नाही, इतकं साधं सरळ सोपं जगता येते
अभिनयाबाबत बोलताना पाटेकर म्हणाले,मनापासून अभिनय करताना परकाया प्रवेश करायलाच लागतो. पूर्वी सांगली, मिरजेला नाटक करून जाताना कोल्हापुरी चप्पल न्यायचो. या नाटक दौऱ्यात पाच सहा रुपये वाचवून घरी वडिलांना चप्पल नेण्याचा आनंद वेगळाच होता. डोळ्यात पाणी येणे अभिनय नसतो. मला भुकेची पार्श्वभूमी होती, जी आपल्याकडून काम करून घेते. कशाचेही भांडवल करायचे नाही, रडायचे नाही, हसत राहायचे. मस्त जगायचे. एकमेकांच्या सहकार्याने राजकारणात काही शक्य नाही पण व्यवसायत हे जे काही सुरू केले आहे ते भव्य आहे.पूर्वी शेजार महत्वाचा होता, हल्ली ते राहिले नाही. जे नव्याने प्रस्थापित करण्याची गरज आहे आणि आयबीएफ तेच करत आहे याचा आनंद आहे. तुमची प्राज्ञा, ताकद, वैचारिकता यावर तुमचे मोठेपण अवलंबून आहे. आपला वाकुब आपली पात्रता ठरवतो. मला आजवर कुणी जात विचारली नाही.संतांनी ब्राह्मणांची मिरासदारी मोडून काढली. आपण जाती विसरू तेव्हा मोठे होऊ. काम करताना आपला चेहरा महत्वाचा नसतो, आपण काय करतो हे महत्त्वाचे. मेंदूत ताकद हवी, विचारधारा महत्वाची असते. आपलीच माणसं भांडतात हे त्त्रासदायक आहे.”
आ.जयंतराव पाटील म्हणाले, एकाच छताखाली अनेक उद्योग पाहण्याची संधी मिळाली आहे. त्यांच्या व्यवसायाला प्रोत्साहन मिळवून देण्यासाठी आयबीएफने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे.उद्योजकांसासाठी प्रतिक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेला पुढाकार कौतुकास पात्र आहे. समाजाशी बांधिलकी जपणारा देशातील एकमेव अभिनेता नाना पाटेकर आहेत. नाम फाउंडेशनमधून जलसंधारणमध्ये मोठे काम केले. नद्यांचे पुनरुज्जीवन, पाझर तलावांचेही काम केले. ५१ लाख ७० हजार शेतकऱ्यांना फायदा मिळवून दिला आहे १५ लाख हेक्टर जमीन ओलिताखाली आणली आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना केलेली मदत मोठी आहे. सो कॅल्ड एनजीओ चालवणाऱ्यांना नानांनी कामातून धडा दिला आहे.
प्रतिक पाटील म्हणाले, उद्योजक एकत्र येतात आणि एकमेकांना मदत करतात,या विचाराने संघटना काम करत आहे. एकमेकां ना मदत करूनच आपण पुढे जाऊ,यशस्वी होऊ शकतो. यातूनही मोठ्या प्रमाणात समाजपरिवर्तन शक्य आहे.
अध्यक्ष विकास राजमाने म्हणाले, स्थानिक उद्योजकांना आयबीएफने हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. उत्सव कुमार यांचे भाषण झाले. उपाध्यक्ष प्रवीण फल्ले,नवाज पटवेकर यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी राजवर्धनभैय्या पाटील, शामराव पाटील,विश्वतेज देशमुख, आर.डी. सावंत,धैर्यशील पाटील,चिमनभाऊ डांगे, विजयराव पाटील,विजयराव यादव,सुस्मिता जाधव रोझा किणीकर,विश्वनाथ डांगे, आर.डी.माहुली,अतुल पाटील,कार्तिक पाटील,पुष्पलता खरात,संग्राम जाधव,सुहास पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सुरज चौगुले यांनी सूत्रसंचालन केले.
उपाध्यक्ष नवाज पटवेकर,प्रवीण फल्ले, कोअर कमिटी सदस्य प्रवीण पाटील,राजू देसाई,शहाजी पाटील,महेश ओसवाल, स्वरूप साळुंखे,वैभव पाटील,जयदीप पाटील, भगतसिंह पाटील,सुप्रिया पेटकर,पुष्पलता खरात,संग्राम पाटील यांनी संयोजन केले.
झिंग कामाची असायला हवी. फालतू पुड्यांतून आलेली झिंग कुठेवर टिकणार?
सांगली जिल्ह्यातील नशेखोरीचा संदर्भ देताना पाटेकर यांनी ‘सध्या नशेखोरीत मुलांचा सहभाग चिंताजनक बनतोय. झिंग कामाची असायला हवी. फालतू पुड्यांतून आलेली झिंग कुठेवर टिकणार?’ असे म्हणत ‘आयुष्यात करण्यासारखे खूप काही आहे, कुठलीही तडजोड करून काम करू नका’,














































































