Last Updated on 15 Jul 2025 8:29 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली । भारतीय वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता पृथ्वीवर परतले आहेत. हे ऐतिहासिक पुनरागमन अॅक्सिओम-4 मोहिमेची यशस्वी पूर्तता आहे, ज्यामध्ये शुभांशूने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) 18 दिवस घालवले.
25 जून रोजी फ्लोरिडातील केनेडी स्पेस सेंटर येथून प्रक्षेपित केलेल्या या मोहिमेदरम्यान, शुभांशूने वनस्पतींच्या वाढीवर आणि सूक्ष्म गुरुत्वाकर्षणावर वैज्ञानिक प्रयोग केले. सोमवारी संध्याकाळी 4:35 वाजता (IST), चारही अंतराळवीर आयएसएसवरून निघाले आणि सुमारे 22.5 तासांच्या प्रवासानंतर, ड्रॅगन कॅप्सूल कॅलिफोर्निया किनाऱ्याजवळील पॅसिफिक महासागरात यशस्वीरित्या खाली उतरले.
शुभांशू शुक्ला आणि इतर क्रूचे परतीचे लाईव्ह पहा शुभांशूच्या टीममध्ये अमेरिकेचे अनुभवी अंतराळवीर पेगी व्हिटसन, पोलंडचे स्लावोस उजनांस्की आणि हंगेरीचे टिबोर कापू यांचा समावेश होता.
पंतप्रधान मोदींनी शुभांशू शुक्ला यांचे केले स्वागत!
पंतप्रधान नरेंद्र मोदी (यांनी ट्विट करून भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांचे त्यांच्या परतीच्या स्वागताबद्दल अभिनंदन केले आहे. त्यांनी लिहिले आहे की, ‘ऐतिहासिक अंतराळ मोहिमेनंतर, पृथ्वीवर परतलेल्या ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांचे मी देशभर स्वागत करतो. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचणारे पहिले भारतीय म्हणून, त्यांनी त्यांच्या समर्पण, धैर्य आणि अग्रगण्य भावनेने अब्जावधी स्वप्नांना प्रेरणा दिली आहे. आमच्या मानवी अंतराळ उड्डाण मोहिमेच्या दिशेने हा आणखी एक मैलाचा दगड आहे – गगनयान.’
कॅप्टन शुभांशू स्वागतम्, आम्हाला आपला अभिमान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई | “स्वागतम् कॅप्टन शुभांशू , आपण तमाम भारतीयांचे अभिमान ठरला आहात. या यशस्वी मोहिमेसाठी आपले आणि आपल्या सहकाऱ्यांचे अभिनंदन..! अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचे आज पृथ्वीवरील आगमनासाठी स्वागत तसेच या या यशस्वी मोहिमेसाठी अभिनंदन केले आहे.
आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात पोहोचलेले पहिले भारतीय अंतराळवीर कॅप्टन शुभांशू शुक्ला आणि त्यांचे सहकारी ‘ॲक्सिओम-४’ ही अंतराळ मोहीम यशस्वी करून पृथ्वीवर परतले. या यशस्वी मोहिमेमुळे भारतीयांचा अवकाश संशोधन क्षेत्रातील आत्मविश्वास दुणावला आहे. भारतीय तरुणांसाठी ही मोहीम प्रेरणादायी ठरणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीक्षेपातील अवकाश संशोधन क्षेत्राच्या विकासासाठी टाकले गेलेले हे महत्त्वाचे पाऊल तमाम भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे. त्यासाठी कॅप्टन शुभांशू यांचे आणि त्यांच्या या साहसाला पाठबळ देणाऱ्यांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचेही मनापासून अभिनंदन,” असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.









































































