Last Updated on 23 May 2025 5:54 PM by Sanjay Patil/Adhorekhit
जळगाव । महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरतीसाठी आवश्यक असलेल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) – २०२५ परीक्षेचे आयोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे – ०४ यांचेमार्फत ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत आहे.
या परीक्षेचे आयोजन दिनांक २४ मे २०२५ ते ५ जून २०२५ या कालावधीत करण्यात आले असून, उमेदवारांची संख्या आणि उपलब्ध परीक्षा केंद्रांच्या सुविधेनुसार परीक्षेच्या तारखांमध्ये आवश्यकतेनुसार बदल होण्याची शक्यता आहे. याबाबतची पूर्वसूचना दिनांक २५ एप्रिल २०२५ रोजी परिषदेच्या अधिसूचनेत कळविण्यात आले होते.
२७ मे २०२५ ते ३० मे २०२५ व २ जून २०२५ ते ५ जून २०२५ या कालावधीत परीक्षा घेतल्या जाणार आहेत. परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र लवकरच उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात येणार असून, परीक्षेशी संबंधित सर्व महत्त्वाच्या सूचना, वेळापत्रक, परीक्षा केंद्राची माहिती इत्यादी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर www.mscepune.in उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
सर्व उमेदवारांनी प्रवेशपत्रावर दिलेल्या व संकेतस्थळावर प्रकाशित सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त अनुराधा ओक यांनी केले आहे.














































































