Last Updated on 16 Sep 2021 4:47 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई : भारताचा कर्णधार विराट कोहलीने टी-२० संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी टी-२० वर्ल्डकपनंतर विराट संघाचे नेतृत्व सोडणार असल्याचे त्याने सांगितले आहे.विराट कोहलीने सोशल मीडिया पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली. सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये विराट कोहली म्हणाला की, त्याने हा निर्णय अत्यंत काळजीपूर्वक घेतला आहे. कामाचा ताण लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे त्याने सांगितले आहे.
विराटनं काय म्हटलं?
भारतीय संघाचे फक्त प्रतिनिधित्वच नव्हे तर नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली हे मी माझं भाग्य समजतो. या प्रवासात मला पांठिबा देणाऱ्या प्रत्येकाचे आभार. सहकारी खेळाडू, सपोर्ट स्टाफ, निवड समिती, माझे प्रशिक्षक आणि प्रत्येक भारतीय यांच्याशिवाय हा प्रवास शक्य नव्हता. कामाचा ताण हा महत्त्वाचा भाग आहे आणि मागील ८-९ वर्षांपासून तीनही फॉरमॅटमध्ये वर्कलोड वाढला आहे आणि ५-६ वर्षांपासून मी नेतृत्वाची जबाबदारीही सांभाळत आहे. त्यामुळे मला आता स्वतःला थोडा वेळ द्यायला हवा, जेणेकरून मी वन डे व कसोटी संघाचे नेतृत्व समर्थपणे पेलू शकेन.
ट्वेंटी-२०त मी टीम इंडियासाठी सर्वोत्तम दिले आणि पुढेही फलंदाज म्हणून योगदान देत राहीन. रवी भाई, रोहित आणि जवळच्या प्रत्येक व्यक्तीशी मी चर्चा केली. त्यानंतरच मी हा निर्णय घेतला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर मी कर्णधारपदावरून पायउतार होणार आहे. याबाबत मी सचिव जय शाह व अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याशीही चर्चा केली.
विराटने टी-२० संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर आता रोहित शर्माला या फॉरमॅटमध्ये संघाची कमान सोपवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.










































































