Last Updated on 26 Jun 2024 10:25 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन २०२४च्या पूर्वसंध्येला प्रथेप्रमाणे चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात सहभागी होऊन सर्व सहकाऱ्यांच्या साथीने चहापानाचा आस्वाद घेतला.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री अतुल सावे तसेच मंत्रिमंडळातील इतर सहकारी आणि आमदार उपस्थित होते.
या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला होता. त्यामुळे सत्ताधारी पक्षाने चहापानाचा आनंद घेतला.
विरोधी पक्षांचा बहिष्कार….
पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची आज बैठक मुंबई येथे झाली. त्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर टीका केली. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यावेळी राज्य सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकत असल्याचे सांगितले. हे सरकार विश्वासघातकी सरकार आहे. देशाच्या पंतप्रधानांनी उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याची वल्गना केली. खरंतर ही जुमलेबाजीच आहे. कारण सरकारने कुठल्याही शेती मालाला दीडपट हमीभाव दिलेला नाही असे त्यांनी सांगितले.
विरोधी पक्षाच्या बैठकीत काँग्रेस विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात, विरोधी काँग्रेस नेते सतेज पाटील, भाई जगताप, राजेश राठोड, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, शिवसेना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, जयंत पाटील, अबू आझमी हे उपस्थित होते.










































































