Last Updated on 01 Nov 2021 4:17 PM by Sanjay Patil/Adhorekhit
लखनऊ ।
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्यापूर्वी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मोठी घोषणा केली आहे.विधानसभा निवडणूक लढवणार नाही,अशी घोषणा अखिलेश यादव यांनी केली.उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत,ज्यासाठी सर्व पक्ष तयारीला लागले आहेत.प्रचाराची रणधुमाळी सुरु असताना अखिलेश यादव यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
अखिलेश यादव यांच्या घोषणेनंतर समाजवादी पक्षाचे मीडिया सल्लागार आशिष यादव यांनी एक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी अखिलेश विधानसभा निवडणूक लढवणार की नाही याचा अंतिम निर्णय पक्ष घेईल, असे म्हटले आहे.
एका वृत्तसंस्थेशी संवाद साधताना अखिलेश यादव यांनी असेही सांगितले की २०२२ च्या उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी ते आणि राष्ट्रीय लोक दल यांच्यातील युतीचा निर्णय झाला आहे.फक्त जागांबाबत चर्चा बाकी आहे.अखिलेश यादव म्हणाले,‘आरएलडीसोबत आमची युती पक्की झाली आहे. सर्व जागांचे वाटप होणे बाकी आहे. अखिलेश यांनी ही प्रतिक्रिया आरएलडीचे जयंत चौधरी यांनी रविवारी काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांची भेट घेतल्यानंतर आली आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये युतीचे समीकरण बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अखिलेश यादव सध्या आझमगड मतदारसंघातून खासदार आहेत. यासोबतच ते उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाचा मुख्यमंत्री चेहराही आहेत.
काका शिवपाल यादव यांना योग्य सन्मान दिला जाईल
काका शिवपाल यादव यांच्या प्रोग्रेसिव्ह समाजवादी पार्टी लोहिया विधानसभा निवडणुकीत सपासोबत येऊ शकेल का? या प्रश्नावर अखिलेश म्हणाले की, ‘मला याबाबत कोणतीही अडचण नाही.त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना योग्य सन्मान दिला जाईल, असे अखिलेश यादव म्हणाले.














































































