Last Updated on 28 Nov 2024 6:59 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या घटकपक्षांमधले मतभेद समोर येत आहेत. तसंच पक्ष संघटन मजबूत करत, एकला चलो रे चा नारा देण्याचे सूरही उमटत आहेत.
पराभवावर प्रतिक्रिया देताना शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते, अंबादास दानवे यांनीही एकट्यानं लढण्याची पक्ष पदाधिकारी आणि शिवसैनिकांची भूमिका असल्याचं म्हटलं आहे. तसंच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं नाव निवडणुकीपूर्वीच मुख्यमंत्री म्हणून जाहीर केलं असतं तर निवडणुकीचे निकाल वेगळे लागले असते, असं मतही त्यांनी मांडलं आहे. महाविकास आघाडीला आमची मतं तर हवी आहेत, मात्र आमचा चेहरा नको, असा आरोपही त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केला आहे.
लोकसभेपासूनच काँग्रेस अतिआत्मविश्वास बाळगून होती, ज्यामुळे नुकसान झाल्याचं त्यांनी म्हटलं. शिवसेनेचा एक विचार आहे, तो विचार घेऊनच स्वतंत्र लढलं पाहिजे, अशी भूमिका अनेक आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडली असल्याचंही दानवे यांनी सांगितलं. विचारधारेवर आधारित संघटन बनवून आम्ही पुन्हा लढा देऊ, असं ते म्हणाले.









































































