Last Updated on 21 Mar 2025 11:37 AM by Sanjay Patil/Adhorekhit
यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात पर्यावरणपूरक रंगपंचमीचा अनोखा उपक्रम!
कडुलिंब-हळदीपासून रंग… विद्यार्थ्यांनी साकारला पर्यावरणपूरक रंगोत्सव
सांगली : वाळवा तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, उरुण-इस्लामपूर येथे यंदाची रंगपंचमी विशेष ठरली. जल, पर्यावरण आणि आरोग्य जपणाऱ्या पद्धतीने सण साजरा करण्याच्या उद्देशाने महाविद्यालयात पर्यावरणपूरक रंग निर्मिती कार्यशाळा घेण्यात आली. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी नैसर्गिक फुलं, पालेभाज्या आणि औषधी वनस्पतींपासून नैसर्गिक रंग तयार करून पारंपरिक सणाला हरित स्पर्श दिला.
कडुलिंब, पालक, बीट, गुलाब, झेंडू, जास्वंद, चाफा, हळदीपासून तयार केले नैसर्गिक रंग कृत्रिम रंगांमुळे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी पर्यावरणस्नेही रंग तयार करण्यावर भर दिला. यामध्ये कडुलिंब, पालक, बीट, गुलाब, झेंडू, जास्वंद, चाफा, हळद यांसारख्या नैसर्गिक घटकांचा वापर करून सुंदर आणि सुरक्षित रंगांची निर्मिती करण्यात आली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला तसेच त्यांचे सर्जनशील कौशल्य विकसित होण्यास मदत झाली.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एम. जाधव व प्रा. मोहिनी पाटील (एस. डी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, इस्लामपूर) यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच बी.एस्सी. विभागाचे समन्वयक प्रा. संतोष पाटील, IQAC समन्वयक डॉ. एम. व्ही. लोंढे आणि मार्गदर्शक प्रा. एस. एस. लोहार उपस्थित होते.
हा उपक्रम केवळ सण साजरा करण्यापुरता मर्यादित न ठेवता, पर्यावरणपूरक जीवनशैली आणि पारंपरिक वारसा जपण्याचा संदेश देणारा ठरला. महाविद्यालयाच्या या अभिनव उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.











































































