Last Updated on 13 Mar 2025 6:50 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई : होलिका उत्सव आज राज्यासह देशभरात साजरा होत आहे. फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन केलं जातं. पुराणकथेनुसार भक्त प्रल्हादाला भस्मसात करण्यासाठी त्याचे वडील हिरण्य कश्यपूची बहिण होलिका हिनं प्रयत्न केला होता. मात्र, त्या अग्नीत तीच भस्मसात झाली. यातून वाईटाचं दहन होऊन, त्यातून चांगलं असलेला हा सण साजरा केला जाऊ लागला. आज रात्री जागोजागी होळीचं दहन केलं जाईल.
विशेषत: कोकण आणि कोळीवाड्यांमध्ये पारंपरिक पद्धतीनं हा उत्सव साजरा केला जातो. होलिका दहन करताना पर्यावरणपूरक साधनांचा वापर करावा, असं आवाहन प्रशासन तसंच सामाजिक संस्थांनी केलं आहे. होलिकादहनाच्या दुसऱ्या दिवशी रंगांची उधळण करत धुळवडीचा आनंदोत्सव साजरा केला जातो. यासाठीही पर्यावरणस्नेही रंगांचा उपयोग करावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.
होलिकापूजन तसंच प्रेम, स्नेह आणि बंधुभावाचं प्रतिक असलेला रंगोत्सव सर्वांच्या जीवनात आनंदाचे रंग भरो आणि परस्परांमधील द्वेष भावना नष्ट करो, अशा शब्दात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी होळी तसंच धुलिवंदनाच्या राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच रंगोत्सव साजरा करताना पर्यावरण रक्षणाबद्दल जागरुक राहण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. होलिकापूजनाच्या निमित्तानं असत्य, अधर्म आणि अहंकाराचं दहन करुन, सत्य, न्याय तसंच सदाचारानं नवसृजन करुया अशा शब्दात मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी जनतेला होलिकापूजनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.














































































