Last Updated on 04 Nov 2021 4:28 AM by Sanjay Patil/Adhorekhit
पुणे |
ऊसाची पूर्ण रास्त व किफायतशीर रक्कम (एफआरपी) न देणार्या राज्यातील 43 साखर कारखान्यांना यंदाचा गाळप परवाना नाकारण्यात आला आहे. यामध्ये भाजपच्या महत्वाच्या नेत्यांच्या साखर कारखान्यांचाही समावेश आहे.शेतकर्यांना एफआरपी प्रमाणे पैसे न दिल्याने परवाने रोखण्यात आले आहेत. संबंधित कारखान्यांनी दिवाळीपर्यंत एफआरपी न दिल्यास त्यानंतर व्याजासह एफआरपी वसूल करण्याचा इशारा साखर आयुक्तालयाने दिला आहे.
राज्यात 2021-22 या आर्थिक वर्षाच्या गाळप हंगामाला दसर्याच्या मुहूर्तावर (15 ऑक्टोबर) सुरुवात झाली. यंदा 194 कारखान्यांनी गाळपासाठी परवानगी मागितली.आतापर्यंत 54 कारखान्यांत गाळप सुरू झाले आहे.मात्र 43 कारखान्यांना परवानगी देण्यात आलेली नाही.
राज्यात अनेक साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाला सुरुवात झालीय. अशावेळी एकरकमी एफआरपीचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. त्यातच साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी भाजप नेत्यांना मोठा दणका दिला आहे. ऊस गाळप हंगामाला सुरुवात झाली असली तरी अजूनही 43 साखर कारखान्यांना परवानाच दिलेला नाही. या 43 साखर कारखान्यांनी मिळून शेतकर्यांची 300 कोटींची एफआरपी थकवली आहे.जोपर्यंत शेतकर्यांचे पैसे दिले जाणार नाहीत, तोवर गाळप परवाना मिळणार नसल्याचे साखर आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.परवाना रोखण्यात आलेल्या साखर कारखान्यांमध्ये भाजपच्या नेत्यांसह शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या साखर कारखान्यांचाही समावेश आहे.
भाजपच्या या नेत्यांच्या कारखान्यांचा गाळप परवाना रोखला
पंकजा मुंडे – वैद्यनाथ कारखाना
रावसाहेब दानवे -रामेश्वर कारखाना
हर्षवर्धन पाटील – इंद्रेश्वर आणि कर्मयोगी शंकरराव पाटील कारखाना
राधाकृष्ण विखे पाटील – राहुरी कारखाना
धनंजय महाडिक – भीमा-टाकळी कारखाना
समाधान आवताडे – संत दामाजी कारखाना
संजय काका पाटील – यशवंत कारखाना आणि एस जी झेड, तासगाव
बबनराव पाचपुते – साईकृपा कारखाना
शिवसेनेच्या या नेत्यांच्या कारखान्याचा परवाना रोखला
तानाजीराव सावंत – भैरवनाथ शुगर
कल्याणराव काळे – चंद्रभागा कारखाना
दिग्वीजय बागल – मकाई कारखाना
दिलीप माने (माजी काँग्रेस आमदार) – सिद्धनाथ कारखाना









































































