Last Updated on 28 Sep 2021 6:23 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मानसी पाटील हिने मुलींमध्ये पटकावला पहिला क्रमांक
हायलाइट्स:
- MPSC जून २०१९ मुख्य परीक्षेचा सुधारित निकाल जाहीर
- यापूर्वीच्या निकालात राज्यात पहिला आलेला प्रसाद चौगुलेच याही निकालात अव्वल
- यापूर्वीचा निकाल एसईबीसी आरक्षणानुसार होता, ते रद्द झाल्याने सुधारित निकाल जाहीर
यूपीएससी पाठोपाठ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेचा अंतिम सुधारित निकाल आज जाहीर झाला आहे. साताऱ्याच्या प्रसाद चौगुले याने या परीक्षेत राज्यात पहिला क्रमांक पटकावला असून मानसी पाटील हिने मुलींमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे.
अंतिम निकाल व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
13 जुलै 2019 ते 15 जुलै 2019 या कालावधीमध्ये राज्य लोकसेवा आयोगातून जी परीक्षा घेण्यात आली होती, त्याचा अंतिम निकाल आज जाहीर झाला आहे. एकूण 413 पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती.
ज्यामध्ये उपजिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, पोलीस उपअधीक्षक अशा वेगवेगळ्या 26 पदांचा यामध्ये समावेश होता.
एमपीएससीकडून जून २०१९ मध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल गेल्या वर्षी जाहीर करण्यात आला होता. मात्र, हा निकाल सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास (SEBC) आरक्षण लागू करून जाहीर करण्यात आला होता. या आरक्षणाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्याने निकाल लागलेल्या सुमारे ४१३ विद्यार्थ्यांना सव्वा वर्ष नियुक्तीचे पत्र मिळाले नव्हते. त्यासंदर्भात काही महिन्यांपूर्वी या विद्यार्थ्यांनी आंदोलनही केले होते. आरक्षणाच्या मुद्द्यावर काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होऊन एसईबीसी आरक्षण रद्द करण्यात आले आणि या आरक्षणाद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांची सर्वसाधारण पद्धतीने निवड करावी, असे आदेश न्यायालयाने दिले. त्यानंतर परीक्षेचा सुधारित निकाल तयार करण्याची प्रक्रिया राबवण्याचे निर्देश राज्य सरकारकडून आयोगाला देण्यात आले. आयोगाकडून कार्यवाही करण्यात येत होती. गेले काही महिने ही प्रक्रिया सुरू होती. अखेर मंगळवारी राज्य सेवा आयोगाने हे निकाल जाहीर केले.

हायलाइट्स:








































































