Last Updated on 29 Nov 2023 6:31 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची सभा बोरगाव (ता. वाळवा) येथे गुरुवारी (ता.30) सायंकाळी 7 वा छत्रपती शिवाजी महाराज चौकात होणार आहे.ऊस दराचे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या सभेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष भागवत जाधव यांनी दिली.
कोल्हापूर जिल्ह्याप्रमाणे सांगली जिल्ह्यात एकरकमी एफ्आरपी अधिक शंभर रुपये व तुटलेल्या ऊसाला शंभर रुपये मिळावे या जनजागृती राजु शेट्टी यांची सभा होत असल्याचे भागवत जाधव यांनी सांगितले.ते म्हणाले,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार,कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ,सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील,जिल्हा पोलीस प्रशासन,जिल्हाधिकारी आणि स्वाभिमानीचे पदाधिकारी यांच्यात दीर्घकाळ चर्चा होऊन 23 नोव्हेंबरला एक फॉर्मुला ठरला.तो फॉर्मुला म्हणजे यावर्षी तुटणाऱ्या उसाची पहिली उचल ही एफआरपी अधिक १०० रुपये देण्याचे व गेल्यावर्षी तुटलेल्या ऊसाला जो आम्ही चारशे रुपयेचा हप्ता प्रतिटन मागत होतो.त्याच्या ऐवजी तीन हजार रुपये ज्यांनी दिलेत त्यांनी 100 रुपये द्यावेत व तीन हजार पेक्षा जास्त दिलेत त्यांनी ५० रुपये द्यावेत असा फॉर्म्युला होता.या फॉर्म्युल्याप्रमाणे सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी दर जाहीर करावा अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची अपेक्षा होती.हा फॉर्म्युला कारखानदारांनी मान्य केला नाही.
या सभेस स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते पंडितराव संपकाळ,जिल्हाध्यक्ष महेश खराडे,पोपट मोरे,संदीप राजोबा, संजय बेले,अँड एस्.यु.संदे,जगन्नाथ भोसले, शिवाजी पाटील, आप्पासाहेब पाटील, प्रकाश देसाई,प्रताप पाटील, प्रदीप पाटील, संतोष शेळके, शहाजी पाटील, प्रविण पाटील सह कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, राजकीयदृष्ट्या जागृत असलेल्या बोरगाव या ठिकाणी ही सभा होत असल्याने श्री.शेट्टी या सभेत काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.









































































