Last Updated on 31 May 2025 6:04 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी कोणत्याही बाह्य शक्तींना कधी जुमानले नाही. त्यांनी मोठ्या हिमतीने रयतेच्या हिताचा कारभार केला आहे,अशी भावना माजी मंत्री आ.जयंत पाटील यांनी इस्लामपूर येथे व्यक्त केली. “आपण लोक वर्गणीतून बिरोबा देवालयाचे काम केले आहे. या देवालयाचे उर्वरित काम पूर्ण करू,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
इस्लामपूर येथील बिरोबा देवालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी बिरोबा देवालयाच्या उर्वरित कामाचा शुभारंभ माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांच्या पत्नी सौ.मंगल मलगुंडे,महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षा पुष्पलता खरात व ५ भगिनींच्या हस्ते करण्यात आला. माजी नगरसेवक विलास बिरु ताटे,माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शहाजी पाटील,संदीप माने प्रामुख्याने उपस्थित होते.
आ.पाटील पुढे म्हणाले,राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी ३०० वर्षांपूर्वी दळणवळणाची साधने तोकडी असताना देशातील १२ जोतिर्लिंगांचा जिर्णोद्धार केला, घाट व मंदीरे बांधली आहेत. त्यांनी केवळ आपल्या राज्यात नव्हे,तर इतर राज्यात जाऊन ही कामे केली आहेत. आपण पूर्वी बिरोबा देवालय परिसरातील मैल्याचे पाणी गटारी व छोटे पूल बांधून बाहेर काढले. आता नगरपालिका,आमदार फंड व सरकारच्या माध्यमातून बिरोबा देवालयाचे उर्वरित काम टप्प्या-टप्प्याने पूर्ण करू. याशिवाय या परिसराचे सुंदर सुशोभिकरणही करू.
याप्रसंगी शहाजी पाटील,आनंदराव मलगुंडे,विलास बिरु ताटे यांनीही मनोगत व्यक्त केले.
माजी नगराध्यक्ष पै.भगवान पाटील,माजी उपनगराध्यक्ष दादासो पाटील,युवा नेते संदीप पाटील,शंकरराव चव्हाण,मुकुंद कांबळे, संचालक शैलेश पाटील,कृष्णेचे संचालक संजय पाटील,सुनिल मलगुंडे,बाळासाहेब कोळेकर,चंद्रकांत ताटे,सचिन ताटे,मानव गवंडी,रवि वाघमोडे,वसंत ताटे,काकासो ताटे,हणमंत कोळेकर,उत्तम कोळेकर,विकास ताटे,प्रितम ताटे,मोहन ताटे यांच्यासह धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी प्रा.मानसिंग ठोंबरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. पंकज ताटे यांनी आभार मानले. महादेव माने यांनी सूत्रसंचालन केले.











































































