Last Updated on 15 Mar 2024 10:50 PM by Sanjay Patil/Adhorekhit
पेडन्यूज बाबत समितीने अत्यंत काटेकोरपणे काम करावे – जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी
सांगली । भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने माध्यम प्रमाणिकरण संनियंत्रण समिती (एमसीएमसी) मार्फत राजकीय पक्ष व उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियावरून जाहिरात प्रसिध्द करण्यापूर्वी प्रमाणिकरण करून घेणे बंधनकारक असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिली.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने नियुक्त केलेल्या माध्यम प्रमाणिकरण व संनिंयंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सहायक जिल्हाधिकारी अमित रंजन, उप जिल्हा निवडणूक अधिकारी निता शिंदे, जिल्हा पुरवठा अधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी 282-सांगली विधानसभा मतदारसंघ आशिष बारकुल, मनपा उपायुक्त स्मृती पाटील, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी यासीन पटेल, सांगली आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी श्रीनिवास जरंडीकर, ज्येष्ठ पत्रकार अशोक घोरपडे, मनपा जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद, शंकरराव पवार तसेच समितीचे सदस्य सचिव तथा प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी फारूख बागवान उपस्थित होते.
एमसीएमसी समितीमध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने आज झालेल्या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी समिती सदस्यांना संबोधित करत असताना निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे कोटकोर पालन करण्याचे निर्देश दिले.
इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमे तसेच समाजमाध्यमांमध्ये जाहिरात करताना राजकीय पक्षांनी व उमेदवारांनी पूर्वप्रमाणिकरण करून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह विहित नमुन्यातील अर्ज समितीकडे सादर करावयाचा आहे. राष्ट्रीय व राज्य स्तरावरील राजकीय पक्षांनी प्रसारण दिनांकाच्या तीन दिवस आधी तसेच, अनोंदणीकृत राजकीय पक्ष किंवा व्यक्तिगत उमेदवारांनी प्रसारण दिनांकाच्या सात दिवस आधी अर्ज सादर करायचा आहे. समितीला एखादा अर्ज योग्य वाटत नसेल तर तो नाकारण्याचा अधिकार आहे. त्यावर संबंधितांना राज्यस्तरीय समिती व सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येईल.
जाहिरात प्रमाणिकरणासाठी आल्यानंतर त्यामध्ये आक्षेपार्ह मजकूर नसावा हे पहावे. सोशल मीडियावरही संबंधितांनी लक्ष ठेवावे.
पेड न्यूज या प्रकारामध्ये मोडणाऱ्या बातम्यांची छाननी करावी.राजकीय पक्ष निवडणुकांमध्ये वृत्तपत्रातील बातम्यांच्या स्वरूपात आपली जाहिरात करतात. या जाहिरातींचे दृश्य स्वरूप बातमीसारखे असले तरी प्रत्यक्षात अशा बातम्या किंमत देऊन छापून आणल्या जातात.अशा जाहिरातींवर लक्ष ठेवावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी यावेळी दिल्या.










































































