Last Updated on 24 Nov 2021 10:41 PM by Sanjay Patil/Adhorekhit
अजिबात पाऊस पडत नसलेल्या एखाद्या समृद्ध व भरभराटीला आलेल्या गावाची आपण स्वप्नातही कल्पना करू शकत नाही, पण असेही एक गाव येमेनमध्ये अस्तित्वात आहे. अजिबात पाऊस न पडणार्या व अतिशय नितांतसुंदर अशा या गावात जगभरातील पर्यटक मोठ्या संखेने येतात.
या आकर्षक व सौंदर्याने परिपूर्ण गावाचे नाव ‘अल हुबैत’ असे असून, येमेनची राजधानी सनाच्या पश्चिमेला हे पहाडी गाव आहे. भूस्थळापासून 3200 मीटर उंचीवर हे गाव वसलेले आहे. विशेष म्हणजे, या गावाचा भारताची आर्थिक राजधानी मुंबईशी एक वेगळाच संबंध आहे. या गावात डोंगररांगांवर इतकी सुरेख व टुमदार घरे बांधली आहेत की, त्यावरून नजर हटविणे अवघड जाते. कोणत्याही भागातून पाहिले तर सुंदर निसर्गाचे दर्शन घडते.

या गावाचे विशेष म्हणजे येथे उकाडा आहे. वातावरण गरम असते. थंडीत अगदी सकाळी खूप थंडी असते पण सूर्य उगवला की पुन्हा उकाडा सुरु होतो. ग्रामीण, शहरी शैलीसह प्राचीन आणि आधुनिक वास्तूकलेचा येथे संगम झाला आहे. या गावात पावसाचे ढग गावाच्या खालच्या पातळीवर तयार होतात त्यामुळे येथे पाऊस पडत नाही असे सांगितले जाते. म्हणजे एका अर्थी ढगांच्या वर वसलेले हे गाव आहे.
या गावात येमेनी समुदायाचे लोक राहतात. अल बोहरा अल मूकरमा असेही या समुदायाला म्हटले जाते. या लोकांचे नेतृत्व मुहम्मद बुरहानुद्दीन यांच्याकडे होते. हा मुस्लिमांमधील इस्मायली संप्रदाय असून बुरहानुद्दीन मुंबई मध्ये राहत होते. २०१४ मध्ये त्यांचे निधन झाले. मात्र अखेरपर्यंत दर तीन वर्षांनी ते या गावाला भेट देत असत.














































































