Last Updated on 22 Nov 2021 11:45 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नव्या वर्षात आघाडी सरकार जाऊन ‘भाजप’ची सत्ता येईल,असा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा दावा
कोल्हापूर ।
गेल्या दोन वर्षापासून महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवरून पायउतार होणार असल्याचे मुहूर्त अनेकवेळा निघाले.आता पुन्हा एकदा नवा मुहूर्त निघाला आहे.नव्या वर्षात ते पुन्हा येणार आहेत.हा नवा मुहूर्त दस्तुरखुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काढला आहे.नव्या वर्षात राज्यात सत्ताबदल होईल असा दावा त्यांनी केला आहे.
कोल्हापूर विधानपरिषद भाजप उमेदवार अमोल महाडिक यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला.या पार्श्वभूमीवर झालेल्या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांनी हा दावा केला आहे.ते म्हणाले,महाविकास आघाडी सरकार आता काहीच दिवसांचे राहिले आहे,नव्या वर्षात राज्यात सत्ताबदल होईल.
महाविकास आघाडी सरकार हे विश्वासघात करुन राज्यात सत्तेवर आहे.विश्वासघाताने गेलेले सरकार पुन्हा मेहनतीने आणता येईल.नवीन वर्षात महाराष्ट्रात नवे सरकार असेल,असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.
यावेळी पाटील म्हणाले, विधानपरिषदेच्या निवडणुकीत अमोल महाडिक मोठ्या फरकाने निवडून येतील. कारण जिल्ह्यातील नगर पालिकांमध्ये भाजप लोकप्रतिनिधींची संख्या अधिक आहे. याशिवाय जे अपक्ष लोकप्रतिनिधी असलेलेही भाजप बरोबर येतील. कारण ज्यांना राजकीय भविष्य समजते, पुढे काय होणार हे कळत त्यांना कल्पना आहे की महाविकास आघाडी सरकार फार काळ टिकणार नाही.
दरम्यान, येत्या नव्या वर्षात देशात आणि राज्यात भाजप सत्तेत असेल. ही गोष्ट डोक्यात ठेवूनच अपक्ष उमेदवार भाजपसोबत आहेत.त्यामुळे विजयाची मॅजिक फिगर आम्ही पार करूच तसेच अमोल महाडिक मोठ्या फरकाने निवडून येतील,असेही पाटील म्हणाले.










































































