Last Updated on 09 Dec 2025 10:49 PM by Sanjay Patil/Adhorekhit
कोल्हापूर। राज्य राखीव पोलिस दल कोल्हापूर येथे हवालदार या पदी कार्यरत असलेले लाईन बजार कसबा बावडा येथील हॉकी पटू अजित विष्णू नलवडे यांची महाराष्ट्र पोलीस दल हॉकी संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. सदर संघ ऑल इंडिया पोलीस दल हॉकी स्पर्धेमध्ये सहभागी होत आहे. सदर स्पर्धा राजकोट गुजरात येथे सुरू आहे. या स्पर्धेमध्ये देशातील सर्व राज्यांच्या पोलिस दलांच्या संघासोबतच प्यारा मिलिटरी, बीएसएफ, सीआरपीएफ, आयटीबीपी, एसएसबी असे 30 हून अधिक संघ सहभागी होत आहेत. पोलीस दलातील ही सर्वोच्च स्पर्धा समजली जाते.
अजित नलवडे यांनी शालेय जीवनापासूनच हॉकी खेळायला सुरुवात केली होती. महाविद्यालयीन जीवनामध्ये त्यांनी डी. वाय. पाटील तसेच महावीर कॉलेज आणि शिवाजी विद्यापीठ संघाकडून अनेक स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविला. हॉकी खेळातील प्राविण्यामुळेच त्यांची राज्य राखीव पोलीस दल महाराष्ट्र मध्ये निवड झाली. 2010 पासून ते या संघाचा भाग आहेत. राज्य राखीव पोलीस दलाच्या संघाच्या कर्णधार पदी ही ते कार्यरत होते. त्यांचा उत्कृष्ट खेळ आणि कामगिरी पाहून महाराष्ट्र पोलीस दलाच्या हॉकी संघाच्या कर्णधार पदी त्यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना राज्य राखीव पोलीस दल बटालियनचे कमांडंट डॉ. प्रशांत अमृतकर,महाराष्ट्र पोलीस दलाचे क्रीडा प्रमुख एपीआय संतोष कांबळे तसेच मार्गदर्शक आणि प्रशिक्षक तुषार कांबळे,झाकीर किल्लेदार आणि वडील निवृत्त सहाय्यक फौजदार विष्णू नलवडे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले आहे. या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. त्यांचे निवडीमुळे कोल्हापूरच्या क्रीडा जगतामध्ये आनंदाचे वातावरण आहे.













































































