Last Updated on 20 Nov 2021 9:08 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली ।
महाराष्ट्राला स्वच्छ सर्वेक्षण वर्ष 2021 चे सर्वाधिक राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत.पुरस्कार प्राप्त या सर्व नगरपालिकांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे.महाराष्ट्राची ही स्वच्छता चळवळीतील कामगिरी अभिमानास्पद आहे.यातून राज्याची मान देशातच नाही तर जगातही गौरवाने उंचावली आहे,असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
‘सुरवातीपासूनच महाराष्ट्राने स्वच्छतेच्या चळवळीत अशी आघाडी ठेवली आहे. ग्रामीण क्षेत्रासह आता नागरी क्षेत्रानेही स्वच्छता चळवळीला आपलेसे केले आहे. लोकसहभाग हा स्वच्छता चळवळीचा आत्मा आहे. आपल्या राज्यात नागरिकांनी आवर्जून आणि सातत्यपूर्ण असा सहभाग घेतला आहे. यामुळेच हे यश मिळविता आले आहे. या यशासाठी या नागरिकांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. पुरस्कार प्राप्त सर्व नगरपालिकांचे पदाधिकारी, वरिष्ठ अधिकारी आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्वांचे या निमित्ताने अभिनंदन. स्वच्छतेची ही चळवळ अशीच अव्याहतपणे सुरू रहावी.त्यासाठी आपण सर्व एकजुटीने करता येतील ते सर्व प्रयत्न करत राहूया, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्राला स्वच्छ सर्वेक्षण वर्ष 2021 चे सर्वाधिक राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. सांगली जिल्ह्यांतील विटा नगरपालिकेला देशात प्रथम क्रमाकांचा तर पुणे जिल्ह्यातील लोणावळा आणि सासवडने दुसरा व तिसरा क्रमांक प्राप्त करून देशात स्वच्छ सर्वेक्षणाचे सलग तीन पुरस्कार पटकावून महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.आज झालेल्या पुरस्कार वितरणामध्ये एकूण पुरस्काराच्या 40 टक्के पुरस्कार महाराष्ट्राला मिळालेले आहेत. वन स्टार मानांकनामध्ये देशभरातील एकूण 147 शहरांचा समावेश आहे. यामध्ये राज्यातील 55 शहरे आहेत. थ्री स्टार मानांकनामध्ये देशभरातील एकूण 143 शहरे आहेत त्यात महाराष्ट्रातील 64 शहरांचा समावेश आहे. फाईव स्टार मानांकनामध्ये देशभरातील 9 शहरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले त्यामध्ये राज्यातील नवी मुंबई या शहराचा समावेश आहे. नवी मुंबई महानगरपालिकेला 6 कोटी रूपयांचा धनादेश बक्षिस स्वरूपात प्रदान करण्यात आला. दहा लाख लोकसंख्यावरील शहरांमध्ये देशभरातील एकूण 48 शहारांची निवड करण्यात आली होती त्यात राज्यातील 10 शहरांचा समावेश आहे. एक ते दहा लाख लोकसंख्या असणाऱ्या 100 शहरांमध्ये राज्यातील 27 शहरांचा समावेश आहे. एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या 100 शहरांमध्ये राज्यातील 56 शहरे आहेत तसेच यामध्ये पहिले वीस शहरे ही महाराष्ट्राचीच आहेत.
एकूण पुरस्कारांपैकी ४० टक्के पुरस्कार महाराष्ट्राला ही अभिमानास्पद बाब! – नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे
सलग तीन पुरस्कार पटकावून महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या या नगरपालिकांचे आणि विविध मानांकनांमध्ये पुरस्कार पटकावणाऱ्या शहरांचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.
‘स्वच्छ सर्वेक्षण’ अंतर्गत स्वच्छता, शहराचा हागणदारी मुक्तीचा दर्जा, घनकचरा व्यवस्थापन, सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज आदी घटकांचे केंद्र शासनाच्या त्रयस्थ संस्थेमार्फत व्यापक सर्वेक्षण केले जाते. या सर्वेक्षणात राज्यातील जनतेचा उत्स्फूर्त सहभाग मिळाल्यामुळे, स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये महाराष्ट्राने सर्वोत्तम कामगिरी केली त्याबद्दल राज्यातील जनतेचे आणि पुरस्कारप्राप्त नगरपालिकांचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.














































































