Last Updated on 01 Aug 2025 11:05 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । महापुरुषांच्या चरित्रांमधून, त्यांच्या कथा- कादंबऱ्या यांच्या वाचनांमधून युवा पिढीला प्रतिकूल परिस्थिती मधून आपले उज्वल भविष्य घडविण्याची प्रेरणा मिळते; असा विश्वास प्रा.डॉ.अशोक शिंदे यांनी व्यक्त केला.
इस्लामपूर येथील वाळवा तालुका शिक्षण संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित संयुक्त कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एम. जाधव होते.
डॉ.अशोक शिंदे म्हणाले, तत्कालीन इंग्रज साम्राज्य उलथवून टाकण्यासाठी अखेरपर्यंत लोकमान्य यांनी आक्रमकपणे स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व केले. उपेक्षित, कष्टकरी आणि सामान्य लोकांच्या उन्नतीसाठी वाणी आणि लेखणी अविरत झिजवणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांवर रशियन राज्यक्रांती, कार्ल मार्क्स, लेनिन यांच्या विचारांचा प्रभाव होता.तर लोकनेते राजारामबापू पाटील यांनी १९५८ ते १९८३ या कालावधीत तीनशे- चारशे किलोमीटरच्या सलग महिना- महिना चालणाऱ्या पदयात्रा काढून जनमानसांचे प्रश्न समजून घेणारे, त्यांच्या विकासासाठी झटणारे लोकनेते राजारामबापू पाटील हे एक आदर्श पदयात्री होते; असेही मत डॉ. शिंदे यांनी मांडले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ.ए.एम जाधव म्हणाले, या तिन्ही महापुरुषांच्या जीवनातील अनेक घटना आणि प्रसंगांमधून आपणास समाज हित, राष्ट्रहित आणि लोकहित जपण्याचे मार्ग सापडतात.
प्रारंभी महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या प्रमुख प्रा. डॉ.मंगल लोंढे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा गणेश स्वामी यांनी सूत्रसंचालन तर प्रा. संजय माने यांनी आभार मानले.
प्रारंभी या महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. महाविद्यालयातील इंग्रजी विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्यावतीने या कार्यक्रमाचे संयोजन झाले.














































































