Last Updated on 03 Oct 2024 11:13 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली | मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने आज घेतला आहे .केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. या बैठकीत मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारने मराठी भाषेसह आणखी पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. मराठीसह बंगाली, असामी, पाली आणि प्राकृत भाषेला अभिजात भाषेचा देण्यात आला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यास मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळाचे आभार मानले आहेत.
आजचा दिवस मराठी भाषा आणि मराठीवर प्रेम करणाऱ्यांसाठी सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा ऐतिहासिक आहे. जगभरात, सातासमुद्रापार पोहचूनही तिथे मराठी भाषा, सणवार उत्सव जोपासणाऱ्यांसाठी गौरवाचा, अभिमानास्पद दिवस आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने काय फायदा होतो?
1) अभिजात भाषेतील स्कॉलर्ससाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळतात.
2) अभिजात भाषेसाठी सेंटर ऑफ एक्सलंन्स फॉर स्टडिज स्थापन करण्यात येतं.
3) प्रत्येक विद्यापीठात अभिजात भाषेसाठी एक अध्यासन केंद्र स्थापन केलं जातं.
2004 मध्ये देशातील तामिळ ही अभिजात भाषेचा दर्जा मिळवणारी पहिली भाषा ठरली.
तामिळनंतर 2006 मध्ये संस्कृत, 2008 मध्ये कन्नड आणि तेलुगू, 2013 मध्ये मल्याळम, 2014 मध्ये ओडिया भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला.
देशात आतापर्यंत सहा भाषांना अभिजात दर्जा मिळाला होता.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी राज्य शासनाने केलेल्या पाठपुराव्यासंदर्भात मराठी भाषा विभागाने दिलेली माहिती
अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी चार निकष लावले जातात
1) संबंधित भाषेच्या साहित्याचा इतिहास हा किमान 1500-2000 वर्षे प्राचीन असावा.
2) या भाषेतील प्राचीन साहित्य हे महत्वाचे, मौल्यवान असावे.
3) भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावं, ती कोणत्या भाषेतून उसनी घेतलेली नसावी.
4) प्राचीन भाषेचे स्वरुप हे सध्याच्या भाषेपासून वेगळे असावे.
या निकषांच्या आधारे संशोधन आणि अभ्यास करुन मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासंदर्भात राज्य शासनाने ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषा तज्ज्ञ संशोधकांची समिती दि.10.01.2012 च्या शासन निर्णयानुसार गठीत केली होती.
या समितीने बरेचसे इतिहास संशोधन केले असून जुने संदर्भ, प्राचीन ग्रंथ, पुरातन काळातील ताम्रपट, कोरीव लेख, शिलालेखांचा संदर्भ इ. प्राचीन दस्ताऐवज तपासले असून त्यांचा आधार घेऊन पुराव्यासह एक सर्वंकष व परिपूर्ण अहवाल शासनास सादर केला आहे. या अहवालामध्ये सविस्तर विवेचनासह मराठी भाषा ही अभिजात भाषेचा दर्जा मिळणेसाठी विहीत केलेल्या निकषांची पूर्तता करते हे पुराव्यांसह स्पष्ट केले.
समितीने तयार केलेला मराठी भाषेमधील मूळ अहवाल दि.12.07.2013 च्या पत्रान्वये केंद्र शासनाकडे पाठविला आहे. त्यानंतर समितीने परिशिष्टांसह सादर केलेला इंग्रजीमधील अहवाल देखील केंद्र शासनाकडे दि.16.11.2013 रोजी पाठविला.
तद्नंतर सदर प्रस्तावाबाबत सचिव, प्रधान सचिव, मुख्य सचिव, मंत्री, मुख्यमंत्री यांचे स्तरावर सातत्याने केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला.
दि. 27.02.2020 रोजी ‘मराठी भाषा गौरव दिनाचे’ औचित्य साघून, सन 2020 च्या द्वितीय (अर्थसंकल्पीय) अधिवेशनात “मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत केंद्र शासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी शिफारस करणारा” शासकीय ठराव महाराष्ट्र विधिमंडळांच्या दोन्ही सभागृहांमध्ये पारित करुन पुढील कार्यवाहीसाठी केंद्र शासनास अग्रेषित करण्यात आला.
या संदर्भात राज्यशासनाचा प्रस्ताव अन्य मंत्रालये व साहित्य अकादमीच्या भाषा तज्ज्ञ समिती मार्फत विचाराधीन असल्याचे केंद्रशासनाने त्यांच्या दि. 20/10/2020 च्या पत्रान्वये कळविले.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा लवकर मिळावा यासाठी पत्र माहिम राबवून राष्ट्रपती महोदयांना साधारणपणे 1 लक्ष पत्रेही पाठविण्यात आली.
प्रस्तावाबाबत सर्वच स्तरावरुन केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला.
मा. मुख्यमंत्री महोदयांनी दि. 24.08.2022 रोजीच्या पत्रान्वये मा. पंतप्रधान महोदयांना मराठी भाषेस अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत विनंती केली आहे. त्यास अनुसरून केंद्रशासनाच्या संस्कृती मंत्रालयाने दि. 03.02.2023 रोजीच्या पत्रान्वये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा राज्यशासनाचा प्रस्ताव केंद्रिय मंत्रालयाच्या विचाराधीन असून त्याबाबतची कार्यवाही सुरू असल्याचे कळविले.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्याकरिता ज्ञानेश्वर मुळे सेवानिवृत्त (भा.वि.से.) यांच्या अध्यक्षतेखाली विभागाच्या अधिनस्त कार्यालयांच्या अध्यक्षांचा सदस्य स्वरुपात समोवश असलेली एक समिती शासन निर्णय, मराठी भाषा विभाग, दि.14.02.2024 अन्वये गठित करण्यात आली.
त्यानुसार सदर समितीच्या आतापर्यंत दोन बैठका झाल्या असून या समितीद्वारे केंद्रशासनाकडे पाठपुरावा चालू होता.
मराठी हा भारताचा गौरव आहे, असं म्हणत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अभिनंदन
मराठी हा भारताचा गौरव आहे, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल अभिनंदन केलं आहे. हा गौरव भारताच्या इतिहासातली मराठी भाषेची भूमिका दर्शवतो. या निर्णयामुळे अनेक लोक मराठी भाषा शिकण्यासाठी प्रेरित होतील अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
माय मराठीसाठी सोन्याचा दिवस – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आजचा दिवस मराठी भाषा आणि मराठीवर प्रेम करणाऱ्यांसाठी सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा ऐतिहासिक आहे. जगभरात, सातासमुद्रापार पोहचूनही तिथे मराठी भाषा, सणवार उत्सव जोपासणाऱ्यांसाठी गौरवाचा, अभिमानास्पद दिवस आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. यासाठी त्यांनी राज्यातील जनतेचे अभिनंदन केले आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाच्या या निर्णयाचे स्वागत करतानाच, मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी राज्यातील मराठी प्रेमी, तसेच साहित्यिक, संशोधकांनी केलेल्या प्रयत्नांचेही कौतुक केले आहे.
आजचा हा दिवस यापुढे ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.
मुख्यमंत्र्यांनी संत ज्ञानेश्वरांच्या माझा मराठाचि बोलु कौतुके। परि अमृतातें ही पैजा जिंके ।। या ओळींचाही दाखला दिला आहे. ते म्हणतात, अखेर माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने एका लढ्याला यश आले. यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे सतत पाठपुरवठा केला होता. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठीला हा दर्जा मिळावा यासाठी आग्रह धरला होता. त्यांच्यासाठी हा निर्णय म्हणजे स्वप्नपूर्ती आहे . निती आयोगाच्या बैठकीतही मराठीला अभिजात दर्जा द्यावी अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी केली होती. या निर्णयामुळे आपल्या प्रदीर्घ लढ्याला यश मिळाले आहे. मराठी माणसांच्या जिव्हाळ्याचा हा निर्णय आदिशक्तीच्या नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी घेतला गेल्याने दुधात साखर असा योग जुळून आला आहे. यासाठी आपल्या लाडक्या मराठीचा यथोचित सन्मान केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांचे आभार मानतो. मराठी भाषा प्रगल्भ आहेच. आता तिचा प्रचार, प्रसार आणखी जोमाने करता येईल. मराठी भाषा आपल्या संतांनी जतन केली, वाढवली. तिचा आपण व्यवहारात आवर्जून वापर केला पाहिजे, असे नमूद करून मुख्यमंत्र्यांनी मराठीला अभिजात दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न करणाऱ्या मराठी भाषक, विचारवंत, भाषा अभ्यासक- संशोधक, साहित्यिक आणि समीक्षक अशा सर्वांचे आभार मानले आहेत.
मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय हा मराठी भाषेसाठी ऐतिहासिक असून आजचा दिवस सोनेरी दिवस असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त करीत या निर्णयाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.
महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्या वतीने आभार मानताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, हा दिवस उजाडावा, यासाठी मी मुख्यमंत्री असताना आणि आताही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात सातत्याने आम्ही पाठपुरावा केला. लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, विवेकसिंधू अशा अनेक ग्रंथाचा आधार घेत मराठी भाषा ही अभिजातच आहे, हे सिद्ध करण्यासाठी अनेक थोरा-मोठ्यांचे, अभ्यासकांचे यासाठी हातभार लागले. मी त्यांचाही अत्यंत आभारी आहे. अखेर आज तो सुदिन अवतरला. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मायमराठीचा हा बहुमान मनाला अतिशय सुखद अनुभूती देणारा आहे. महाराष्ट्रातील आणि जगभरातील तमाम मराठीजनांचे मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. मराठी भाषेच्या सर्वांगिण विकासासाठी आता अनुदानासह केंद्र सरकारच्या पातळीवरसुद्धा सर्व ते सहकार्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मराठी भाषेच्या जतन-संवर्धनासाठी राज्य सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. यात राज्यात मराठी विद्यापीठाची स्थापना, बोली भाषा विस्तार प्रकल्प, राज्यात वाचन चळवळ, पुस्तकांचे गाव, मराठी भाषा भवन असे अनेक निर्णय समाविष्ट आहेत. माय मराठीची पताका अशीच उंच फडकत राहील, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी म्हटले आहे.
मराठी भाषेचा गौरवशाली इतिहास, सांस्कृतिक वैभव जगभर पोहचेल-उपमुख्यमंत्री अजित पवार
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय ऐतिहासिक असून या निर्णयाने जगभरातील मराठीभाषक, मराठीप्रेमी आनंदित झाले आहेत. या निर्णयामुळे मराठी भाषेचा गौरवशाली इतिहास, समृद्ध सांस्कृतिक वैभव जगभर पोहचेल, मराठी भाषा ज्ञानभाषा, अर्थार्जनाची भाषा बनण्यास मदत होईल. महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद निर्णय घेतल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि संपूर्ण केंद्रीय मंत्रीमंडळाचे मी मनापासून आभार मानतो,’ अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त करुन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या प्रतिक्रियेत पुढे म्हणाले की, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, ही महाराष्ट्राची गेल्या अनेक दशकांची मागणी होती. ही मागणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामुळे पूर्ण झाली आहे. यासाठी गेली अनेक दशके प्रयत्न करणाऱ्या सर्व मराठी भाषाप्रेमींचे अभिनंदन करतो. त्यांना धन्यवाद देतो. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समस्त महाराष्ट्रवासीयांचे, मराठीभाषकांचे, मराठी भाषाप्रेमींचे अभिनंदन केले असून यानिमित्ताने सर्वांना शुभेच्छाही दिल्या आहेत.










































































