Last Updated on 19 May 2023 3:13 PM by Sanjay Patil/Adhorekhit
![]()
सांगली । वाळवा तालुक्यातील बहे येथील मयूर सुधीर रोकडे याला धनुर्विद्या या क्रीडा प्रकारामध्ये राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (सन २०२१-२२) जाहीर झाला आहे.
मयूर हा वाई (जि.सातारा) येथील किसनवीर महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे.मिणचे येथील आदर्श विद्यानिकेतनमध्ये शांतिनाथ अनुजे यांच्या मार्गदर्शनाखाली धनुर्विद्येचे प्रशिक्षण घेतल्यानंतर मयूरने विविध राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धामध्ये चमकदार कामगिरी नोंदवली.मयूर याने या अगोदर विद्यापीठस्तरीय,राज्यस्तरीय,राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर धनुर्विद्यामध्ये (आर्चरी) नेत्रदीपक कामगिरी करुन अनेक पुरस्कार मिळवले आहेत.पुणे,भुवनेश्वर,बंगळुरू येथे झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेत त्याने राज्याचे प्रतिनिधित्व केले होते.चंदीगड,भुवनेश्वर येथे झालेल्या अखिल भारतीय विद्यापीठ धनुर्विद्या स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व केले आहे.त्यात त्याला व्यक्तिगत तसेच सांघिक प्रकारात घवघवीत यश मिळाले होते.
सन २०१६ पासून विद्यापीठ धनुर्विद्या स्पर्धांमध्ये तो सहभाग घेत आहे.सध्या तो मिणचे येथे सराव करत आहे.उस्मानाबाद येथे झालेल्या १८ व्या वरिष्ठ राज्य धनुर्विद्या स्पर्धेत त्याने वैयक्तिक प्रकारात प्रथम क्रमांक,पालघर येथे झालेल्या १७ व्या वरिष्ठ राज्य धनुर्विद्या स्पर्धेत वैयक्तिक प्रकारात प्रथम तर सांघिक प्रकारात तृतीय क्रमांक तसेच पेठ वडगाव येथे झालेल्या १६ व्या वरिष्ठ राज्य धनुर्विद्या स्पर्धेत वैयक्तिक प्रकारात प्रथम तर सांघिक प्रकारात द्वितीय क्रमांक मिळवला होता.४० व्या कनिष्ठ राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत त्याला २ सुवर्ण पदके मिळाली आहेत.
महाराष्ट्र शासनाकडून लवकरच मयूरचा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देऊन गौरव केला जाणार आहे.आ. जयंत पाटील यांचे नेहमी त्याला प्रोत्साहन मिळाले आहे.शांतीनाथ अनुजे हे प्रशिक्षक(कोच) आहेत.मयूरचे वडील सुधीर रोकडे हे बहेचे माजी सरपंच आहेत.वडील सुधीर रोकडे व आई वैशाली रोकडे,चुलते संदीप रोकडे तसेच माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ,विद्याताई पोळ,प्रा.डी.एस.घुगरे,प्रा.एम ए.परीट,प्रा.एस.पी.पाटील,प्रा.सुनील पाटील,समीर पवार आदींचे मयूरला वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.
![]()










































































