Last Updated on 02 Sep 2025 9:22 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानात मराठा बांधवांच्या आरक्षणासाठी केलेल्या उपोषणाला यश मिळाले आहे. राधाकृष्ण विखे- पाटील यांनी जीआर आणल्यानंतर लगेच जरांगे पाटील यांनी ज्यूस घेऊन हे उपोषण सोडत असल्याचे जाहीर केले आहे. मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांची शिष्टाई अखेर कामी आली आहे.जरांगे पाटील यांनी जीआर मिळताच आपल्या पाठीराख्यांना आता मुंबई सोडून आप-आपल्या गावी जाण्याचे आवाहन केले आहे. अखेर यशाचा गुलाल उधळत मराठा बांधवांनी हा विजय साजरा केला.
मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी पाच मागण्या केल्या होत्या. त्यावर मराठा उपसमितीकडून आठ प्रस्ताव जरांगे यांना देण्यात आले. त्यातील सहा मागण्या सरकारकडून मान्य करण्यात आल्या. यानंतर मनोज जरांगेंनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन आपण उपोषण सोडत असल्याची घोषणा केली.
मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावं, अशी मागणी केली होती. त्याचबरोबर ‘उपोषण सोडण्यासाठी या, तुमचं आमचं वैर संपलं असे म्हटले. मात्र, ही घोषणा केल्यानंतर काही क्षणातच आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन जरांगे यांनी उपोषण सोडले.

दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत सुरु असलेले उपोषण सोडल्यानंतर मनोज जरांगे यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळल्याचे दिसले. तसेच त्यांच्या चेहऱ्यावर समाधानही दिसत होते. उपोषण सोडताना जरांगे पाटलांनी मराठा बांधवांना गावाकडे जाताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच मी आता रुग्णालयात जाणार आहे असेहीही त्यांना सांगितले. यावेळी उपोषण सोडल्यानंतर मराठा आंदोलकांनी गुलालाची उधळण केली. तसेच गणपतीची आरतीही करण्यात आली. तर मराठा आरक्षण उपसमितीनेही मराठा समाजाचे आभार मानले.

हे झाले निर्णय …
हैदराबाद संस्थानच्या गॅझेटिअरची अंमलबाजवणी करणार असे सरकारने यावेळी मान्य केले आहे. तसेच सातारा संस्थानच्या गॅझेटिअरची अंमलबजावणी करण्यासाठी एक महिना घेतलेला आहे. शिवेंद्र राजेंनी जबाबदारी घेतली आहे. त्यांनी शब्द दिला आहे. त्याचीही अंमलबजावणी देणार आहे.
तसेच मराठा आंदोलनाच्या वेळी मराठा बांधवांवर दाखल केलेल्या केसेस मागे घेण्यात येणार आहे. ज्या प्रकरणात कोर्टात खटला दाखल झाला आहे त्याबाबत कोर्टाला विनवणी करुन केसेस मागे घेण्यात येणार आहेत. त्याचाही जीआर काढण्यात येणार आहे.
मराठा आंदोलनात बलिदान झालेल्यांच्या कुटुंबीयांना आठ दिवसात नुकसान भरपाई देणार आहेत, तसेच वारसाला नोकरी देण्यात येणार असल्याचे सरकारने यावेळी जाहीर केलेले आहे.
सातारा आणि हैदराबाद या दोन्ही गॅझेटिअरचे दोन जीआर. वेगवेगळे,बाकीच्या मागण्यांचा एक जीआर असे तीन जीआर काढण्यात येणार आहेत. तसेच सातारा आणि हैदराबाद गॅझेट संदर्भातील ५८ लाख नोंदी ग्रामपंचायतीत राहणार आहेत.











































































