Last Updated on 12 Aug 2025 5:10 PM by Sanjay Patil/Adhorekhit
गौरी-गणपतीसह येणाऱ्या सणाच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध विभागाचा इशारा
सांगली । राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या निर्देशानुसार सणासुदीच्या पार्श्वभूमीवर दि. 11 ते 18 ऑगस्ट 2025 या सात दिवसांच्या कालावधीत सांगली जिल्ह्यात मिठाई, खवा, फरसाण, चिवडा इत्यादी अन्नपदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांवर विशेष धडक तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. स्वच्छ, सुरक्षित आणि निर्भेळ अन्नपदार्थ विक्रीसाठी उपलब्ध करणे ही अन्न व्यावसायिकांची जबाबदारी आहे. तपासणीदरम्यान कोणतीही त्रुटी आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त अन्न रावसाहेब समुद्रे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिला आहे.
सणासुदीच्या काळात या पदार्थांची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याने, काही ठिकाणी भेसळयुक्त किंवा निकृष्ट दर्जाचे पदार्थ विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सर्व आस्थापनांची सखोल तपासणी केली जाणार असून, वापरले जाणारे तेल, तूप, दूध व अन्य पदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जाणार आहेत. ग्राहकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले असून, कुठेही भेसळयुक्त किंवा कमी दर्जाचे अन्नपदार्थ विक्री होत असल्याचे आढळल्यास त्वरित प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक 1800 222 365 वर माहिती द्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाकडून करण्यात आले आहे.














































































