Last Updated on 28 Nov 2024 5:56 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । भारतीय संविधान हे माणसाला मुक्त जगण्याचे स्वातंत्र्य देते असे विचार बार्टीचे समतादूत अंकुश चव्हाण यांनी इस्लामपूर येथील मालती कन्या महाविद्यालयाच्या एकदिवशीय कार्यशाळेत व्यक्त केले.
राष्ट्रीय सेवा योजना राज्यशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित कार्यशाळेत ते बोलत अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अंकुश बेलवटकर होते.
ते पुढे म्हणाले, “पूर्वी ज्या गोष्टीचा माणूस विचार ही करू शकत नव्हता आशा घटना वास्तवात घडवून आणण्याचे अनमोल काम संविधानाने केलेले आहे. संविधानाची उद्देशिका ही घटनेचा अर्थ लावण्यासाठी सहाय्य करण्याची सूत्रावली आहे.तो घटनेचा मूळ गाभा,आत्मा आहे. लोककल्याणकारी राज्याची व्यवस्था निर्माण करणे आणि माणसाला सर्वोच्च असणारा सामाजिक न्याय देण्याची संकल्पना संविधानाच्या सरनाम्यात मांडलेली आहे.
दर्जाची आणि संधीची समानता यावर बोलताना ते म्हणाले की सध्या आरक्षणावर टीका होते,तो भेद आहे असे म्हटले जाते ,मात्र घटनाकारांनी समाजामध्ये समानता आणण्यासाठी,समता प्रस्थापित करण्यासाठी,इतरांच्या बरोबरीची संधी निर्माण करण्यासाठी तो केलेल्या एक न्याय्य भेद असल्याचे आपण समजून घेतले पाहिजे. यावेळी त्यांनी घटनेच्या सरनाम्यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगून त्याचे विस्तृत असे विवेचन केले शेवटी त्यांनी आपल्या हक्कांबरोबर आपल्या कर्तव्याचीही जाणीव आपल्याला असायला हवी. आपला देश उत्तरोत्तर प्रगती करण्यासाठी आपल्या मधलं चांगलं अधिक अधिक देशाला देत चला.”
प्राचार्य डॉ. अंकुश बेलवटकर म्हणाले, “आपल्या प्रत्येकाचे अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य निकराने टिकवण्याची आवश्यकता व्यक्त केली, तेव्हाच आपले स्वातंत्र्य अबाधित राहते.आपल्या संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र भारतात राहण्याचा समान अधिकार दिला आहे. आपल्या देशाच्या संविधानाच्या निर्मितीमध्ये डॉ. भीमराव आंबेडकर यांचा सर्वात महत्त्वाचा वाटा होता. राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्राप्रतिचे उत्तरदायित्व मोठे आहे.”
प्रास्ताविक प्रा.डॉ. मेघा संजय पाटील यांनी केले. प्रा. स्वाती चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.श्रेणिक मासाळ प्रा. मेघमाला पाटील यांनी मनोगते व्यक्त केली.संयोजन प्रा. अजय आयरेकर, प्रा. श्रेणिक मासाळ यांनी केले. प्रा. डॉ. मेघा पाटील प्रा. के बी पाटील प्रा. श्रीकांत जाधव, राम घुले प्रा वर्षा पाटील, प्रा संजय चव्हाण, प्रा उत्तरा पाटील प्रा. संध्या साठे, प्रसाद जाधव.प्रा. अमृता निलाखे श्री सुनील बागुल व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.







































































