Last Updated on 21 Oct 2021 4:52 PM by Sanjay Patil/Adhorekhit
रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.15 टक्के; मार्च 2020 नंतरचा हा सर्वाधिक दर
गेल्या 24 तासांत 18,454 नवीन रुग्णांची नोंद
भारताचा सक्रिय रुग्णभार सध्या 1,78,831 इतका
नवी दिल्ली :
देशाने ऐतिहासिक कामगिरी बजावत आज कोविड -19 लसींच्या 100 कोटी मात्रा देण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा ओलांडला आहे. आपल्या ट्विटरसंदेशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांचे अभिनंदन केले आणि हा विस्मयकारक पराक्रम गाजविल्याबद्दल देशातील वैज्ञानिक समुदाय आणि आरोग्य व्यावसायिकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.मनसुख मांडवीया यांनीही देशाने हे यश संपादन केल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
गेल्या 24 तासांमध्ये 17,561 रूग्ण कोविडमुक्त झाल्याने, बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या (महामारीच्या प्रारंभापासून)ही 3,34,95,808 इतकी झाली आहे.
परिणामी, भारतात रूग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.15% आहे. हा दर सध्या मार्च 2020 नंतरच्या उच्चांकी स्तरावर आहे.
![]()
केंद्र आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडून सातत्यपूर्ण आणि सहयोगी प्रयत्नांमुळे सलग 116 दिवसांपासून 50,000 पेक्षा कमी दैनंदिन नवीन प्रकरणांचा नोंदवल्या जाणाचा कल कायम आहे.
गेल्या 24 तासांत देशभरात 18,454 नवीन रूग्णांची नोंद झाली .
सक्रीय रुग्णांची संख्या सध्या 2 लाखांच्या खाली आहे आणि ती 1,78,831 आहे. सक्रीय रुग्ण दर सध्या देशातील एकूण रुग्णांच्या 0.52% आहे, जो मार्च 2020 नंतर सर्वात कमी आहे.
देशभरात चाचण्यांच्या क्षमतेत सतत वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत एकूण 12,47,506 चाचण्या केल्या गेल्या. भारताने आतापर्यंत एकूण 59.57 कोटी (59,57,42,218) चाचण्या पूर्ण केल्या आहेत.
देशभरात चाचणी क्षमता वाढत असताना, साप्ताहिक पाॅझिटिव्हिटी दर 1.34% वर असून गेल्या 118 दिवसांपासून 3% पेक्षा कमी राहिला आहे. दैनंदिन पाॅझिटिव्हिटी दर 1.48% इतका नोंदवला गेला आहे. दैनंदिन पाॅझिटिव्हिटी दर गेल्या 52 दिवसांपासून 3% च्या खाली आणि आता सलग 135 दिवस 5% च्या खाली राहिला आहे.

कोणत्या देशात किती लसीकरण झाले?
भारताने १०० कोटीचा टप्पा पार केला आहे. तर अन्य देशात अजून ५० कोटीही लसीकरण पूर्ण झालेले नाही. संयुक्त राज्य अमेरिकात ४१.०१ करोड लसीकरण झाले आहे. त्या पाठोपाठ ब्राजिलमध्ये २६.०२ करोड लसीकरण झाले आहे.
पंतप्रधान मोदींनी १०० कोटींच्या लसीकरणाचा टप्पा पार केल्यानंतर या संदर्भात ट्वीटही केले आहे. भारताने इतिहास रचला आहे. आम्ही भारतीय विज्ञान, उद्यम आणि १३० कोटी भारतीयांच्या सामूहिक भावनेच्या विजयाचे साक्षीदार आहोत. १०० कोटी लसीकरण पार केल्याबद्दल भारताचे अभिनंदन. आमच्या डॉक्टर, परिचारिका आणि प्रत्येकाने ज्यांनी ही कामगिरी साध्य करण्यासाठी काम केले त्यांचे आभार,असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदी हे लसीकरण मोहीम पुढे नेल्याबद्दल आरोग्य कर्मचाऱ्यांचे सतत कौतुक करत आहेत.
लसीकरणात यूपी प्रथम क्रमांकावर, संपूर्ण डोसमध्ये महाराष्ट्र अव्वल
लसीकरणाच्या बाबतीत उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत 12.21 कोटीहून अधिक लोकांनी येथे लस घेतली आहे. पूर्णपणे लसीकरण अर्थात दोन्ही डोस घेणाऱ्यांची संख्या सुमारे 2 कोटी 78 लाख आहे. 9.32 कोटी लसीकरणाच्या डोजसह महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर आहे. संपूर्ण लसीकरणात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. येथे दोन्ही डोस घेणाऱ्या लोकांची संख्या 2.88 कोटी आहे. पश्चिम बंगाल तिसऱ्या क्रमांकावर आहे, जिथे 6.85 कोटी डोज देण्यात आले आहेत. तर 1.87 कोटी लोकांनी दोन्ही डोज घेतले आहेत. गुजरात चौथ्या क्रमांकावर आहे, जिथे सुमारे 6.76 कोटी लोकांचे लसीचे डोज देण्यात आले. येथे 2.35 कोटी लोकांना कोरोना लसीचे दोन्ही डोज मिळाले आहेत. 6.72 कोटी लोकांना लसीकरण करून मध्य प्रदेश पाचव्या स्थानावर आहे.
असे आहेत टप्पे
- 16 जानेवारीला कोरोना लसीकरणा सुरुवात
- 1 फेब्रुवारीला एक कोटी डोस पुर्ण.
- 15 जून रोजी 25 कोटी डोस पूर्ण
- 6 ऑगस्ट रोजी 50 कोटी डोस पूर्ण
- 13 सप्टेंबरला 75 कोटी लसींचा टप्पा पूर्ण
- 21 ऑक्टोंबर 100 कोटी लसींचा टप्पा पूर्ण










































































