Last Updated on 29 Oct 2023 10:53 PM by Sanjay Patil/Adhorekhit
लखनौ । भारत आणि इंग्लंड यांच्यातील विश्वचषकाच्या 29 व्या सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी इंग्लंडला चारीमुंड्या चीत करत 20 वर्षाच्या पराभवाचा बदला घेतला.या विजयाने भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहचला असून गतविजेते हे बाहेर पडले आहेत.भारताने तब्बल 100 धावांनी इंग्लंड संघाचा पराभव केला.
मोहम्मद शमी,जसप्रीत बुमराह आणि फिरकीपटूंनी इंग्लिश फलंदाजांची पळताभुई थोडी झाली.रोहित शर्माला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.गतविजेत्या इंग्लंडचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले. सहा सामन्यात इंग्लंडला पाचव्या पराभवाचा सामना करावा लागला.इंग्लंडचा संघ पाच पराभवासह तळाला आहे. तर दुसरीकडे टीम इंडियाने सलग सहाव्या विजयाची नोंद करत पुन्हा एकदा अव्वल स्थानावर झेप घेतली आहे.

रोहित शर्माच्या शानदार खेळीच्या जोरावर भारताने इंग्लंडविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत नऊ गडी गमावून 229 धावा केल्या होत्या.भारताकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक 87 धावा केल्या.प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ 34.5 षटकांत 129 धावांवर गडगडला.इंग्लंडकडून लियाम लिव्हिंगस्टोनने सर्वाधिक 27 धावा केल्या. बेन स्टोक्स आणि जो रुट यांना खातेही उघडता आले नाही.भारताकडून मोहम्मद शमीने 4, जसप्रीत बुमराहने 3 आणि कुलदीप यादवने 2 विकेट घेतल्या. इंग्लंडकडून डेव्हिड विलीने सर्वाधिक तीन बळी घेतले.विश्वचषक 2023 मध्ये भारताने प्रथमच पहिल्या डावात फलंदाजी केली.

दरम्यान, 230 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात खूपच खराब झाली.पहिल्या पॉवरप्लेमध्येच संघाने 4 गडी गमावले. इंग्लंडने 10 षटकांत 4 गडी गमावून 40 धावा केल्या. जसप्रीत बुमराहने पाचव्या षटकात डेव्हिड मलान (16) आणि जो रुट (0) यांना सलग चेंडूवर बाद केले. यानंतर मोहम्मद शमीने बेन स्टोक्स (0) आणि जॉनी बेअरस्टो (14) यांनाही लागोपाठच्या चेंडूंवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. कुलदीप यादवने आपल्या मॅजिक बॉलने कर्णधार जोस बटलरला (10) पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. शमीने दुसऱ्या स्पेलमध्ये मोईन अलीला (15) बाद केले. जडेजाने ख्रिस वोक्सला (10) पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर कुलदीपने लियाम लिव्हिंगस्टोनला (27) बाद करुन भारताचा विजय जवळपास निश्चित केला. शमीने आदिल रशीदला बाद करुन चौथी विकेट घेतली. शेवटी जसप्रीत बुमराहने मार्क वुडला बाद करुन इंग्लंडचा डाव संपवला.
भारतीय संघाने सहाव्या विजयासह सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे.भारतीय संघाचे अद्याप तीन सामने शिल्लक आहेत.श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्स यांच्याबरोबर भारताला खेळायचे आहे.










































































