Last Updated on 19 Dec 2025 11:28 PM by Sanjay Patil/Adhorekhit
अहमदाबाद | भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाचव्या व निर्णायक टी-20 सामन्यात भारताने दमदार कामगिरी करत पाहुण्या संघावर 30 धावांनी विजय मिळवला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्याबरोबरच भारताने पाच सामन्यांची टी-20 मालिका 3–1 ने जिंकत आपले वर्चस्व सिद्ध केले. युवा खेळाडूंची आत्मविश्वासपूर्ण कामगिरी आणि अनुभवी खेळाडूंची परिपक्व साथ यामुळे हा विजय अधिक महत्त्वाचा ठरला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारताने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळाची भूमिका घेतली. प्रथम फलंदाजी करत भारताने निर्धारित 20 षटकांत 5 गडी गमावून 231 धावांचा भक्कम डोंगर उभा केला. युवा फलंदाज तिलक वर्मा याने आक्रमक खेळी करत 73 धावा केल्या, तर हार्दिक पांड्या यानेही जबाबदारीने फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. दोघांच्या खेळीमुळे भारताला मोठी धावसंख्या उभारता आली.
कर्णधार हार्दिक पांड्या यानेही जबाबदारीने खेळ करत अवघ्या 25 चेंडूत 63 धावांचे अर्धशतक झळकावले. शेवटच्या षटकांत शिवम दुबेने 3 चेंडूत 10 धावा काढत भारताला 230 पार नेले. सूर्यकुमार यादव 7 चेंडूत 5 धावांवर बाद झाला. भारताला 9 अतिरिक्त धावा मिळाल्या. ही धावसंख्या निर्णायक सामन्यासाठी दबाव निर्माण करणारी ठरली.
232 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाची सुरुवात आक्रमक झाली. क्विंटन डी कॉक याने 35 चेंडूत 65 धावांची झुंजार खेळी केली. डिवाल्ड ब्रेव्हिसने 17 चेंडूत 31 धावा जोडल्या. मात्र भारतीय गोलंदाजांनी मध्य षटकांत अचूक मारा करत सामना आपल्या बाजूने वळवला. वरुण चक्रवर्ती याने 4 षटकांत 53 धावा देत 4 महत्त्वाच्या विकेट्स घेत दक्षिण आफ्रिकेचा कणा मोडला. जसप्रीत बुमराह यानेही 4 षटकांत केवळ 17 धावा देत 2 फलंदाजांना बाद केले. इतर फलंदाजांना मोठी खेळी करता न आल्याने दक्षिण आफ्रिकेचा संघ 20 षटकांत 8 गडी गमावून 201 धावांपर्यंतच मजल मारू शकला.
मालिका भारताच्या नावावर
या विजयासह भारताने पाच सामन्यांची टी-20 मालिका 3–1 ने जिंकली. एक सामना अनिर्णीत/रद्द ठरल्याने मालिकेचा निकाल स्पष्ट झाला. ही मालिका भारतासाठी आगामी आंतरराष्ट्रीय टी-20 स्पर्धा आणि विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
युवा खेळाडूंची छाप
या मालिकेत युवा खेळाडूंनी सातत्यपूर्ण कामगिरी करत निवडकर्त्यांचे लक्ष वेधले. तिलक वर्मा, गोलंदाज वरुण चक्रवर्ती यांच्यासह इतर तरुण खेळाडूंनी संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागात संतुलित कामगिरी करत भारताने हा निर्णायक सामना जिंकला आणि मालिका आपल्या नावावर केली. युवा खेळाडूंच्या आत्मविश्वासपूर्ण खेळीमुळे आणि अनुभवी खेळाडूंच्या मार्गदर्शनामुळे भारतीय संघ आगामी टी-20 स्पर्धांसाठी सज्ज असल्याचे चित्र या सामन्यातून स्पष्ट झाले.













































































