Last Updated on 30 Dec 2021 9:41 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सेंच्यूरियन |
भारतीय संघाच्या दक्षिण अफ्रिका दौऱ्याची सुरुवात विजयाने झाली आहे. गुरुवारी भारतीय संघाने दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात ११३ धावांनी विजय मिळवला.या विजयासोबत भारतीय संघाने कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव १९१ धावांवर बाद करून भारतीय गोलंदाजांनी पुन्हा एकदा आपले कर्तुत्व सिद्ध केले आहे.
भारताने 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील सलामीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) 113 धावांनी धुव्वा उडवला आणि शेवटच्या 6 विकेट्स घेत ऐतिहासिक विजय मिळवला. 1992 पासून दक्षिण आफ्रिकेतील 22 कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचा हा केवळ चौथा विजय आहे. भारताने (India) दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिकेत एका नंतर दुसऱ्यांदा आघाडी घेतली आहे. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या 2006-07 दौऱ्यावर राहुल द्रविडच्या नेतृत्वातील संघाने 1-0 ने आघाडी घेतली होती पण अखेरीस 3 कसोटींची मालिका 1-2 ने गमावली.
चौथ्या दिवसअखेरआफ्रिकेने ४ बाद ९४ धावा केल्या होत्या. भारताच्या जसप्रीत बुमराहने अखेरच्या षटकात विकेट घेऊन आफ्रिकेला दणका दिला होता. त्यानेच आज अखेरच्या दिवशी आफ्रिकेला पहिला धक्का दिला. काल दिवसभर चिवट फलंदाजी करणारा आणि भारताच्या विजयातील सर्वात मोठा अडथळा असलेला कर्णधार डीन एल्गर याला बुमराहने ७७ धावांवर बाद केले. एल्गरच्या विकेटने भारताला विजयाचा मार्ग सापडला. पण त्यानंतर देखील दोन असे फलंदाज होते जे विजय रोखू शकत होते. त्यातील क्विंटन डी कॉकला मोहम्मद सिराजने २१ धावांवर माघारी पाठवले. पहिल्या डावात पाच विकेट घेणाऱ्या मोहम्मद शमीने वियान मल्डर याला बाद करून आफ्रिकेला सातवा धक्का दिला. लंच ब्रेकपर्यंत दक्षिण आफ्रिकेने ७ बाद १८२ धावा केल्या होत्या. लंचनंतरच्या पहिल्याच षटकात मोहम्मद शमीला मार्को जॅन्सनने दोन चेंडूवर चौकार मारले. पण पाचव्या चेंडूवर शमीने त्याला पंतकडे झेलबाद करून आफ्रिकेला आठवा धक्का दिला. त्यानंतर फिरकीपटू आर. अश्विनने दोन बळी मिळवले आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
चौथ्या डावात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरने सर्वाधिक 77 धावा केल्या. त्याचवेळी भारताकडून शमी आणि बुमराहने प्रत्येकी 3 बळी घेतले. मोहम्मद सिराज आणि रविचंद्रन अश्विननेही प्रत्येकी दोन बळी घेतले. शमीने संपूर्ण सामन्यात 8 विकेट घेतल्या.
दोन्ही संघ-
भारत : केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, विराट कोहली (कॅप्टन), ऋषभ पंत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
दक्षिण अफ्रिका : डीन एल्गर (कॅप्टन), एडेन मार्कराम, कीगन पीटरसन, रायसे व्हॅन डर ड्युसेन, टेम्बा बाउमा, क्विंटन डी कॉक (विकेटकीप), विआन मुल्डर, मार्को जेन्सन, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी.











































































