Last Updated on 28 Feb 2022 10:29 PM by
मुंबई : बॉलिवूड विश्वातील प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका सरोज खान यांचे शुक्रवारी पहाटे मुंबईत निधन झाले.गेल्या काही दिवसांपासून त्यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने त्या अस्वस्थ होत्या.त्यामुळे त्यांना वांद्रे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.रात्री उशिरा त्यांची तब्येत खालावली आणि शुक्रवारी त्यांचे निधन झाले.त्या ७२ वर्षांच्या होत्या.
सरोज खान यांचे नाव निर्मला नागपाल होते.२२ नोव्हेंबर १९४८ रोजी त्यांचा जन्म झाला होता.फाळणीनंतर त्यांचे कुटूंब पाकिस्तानमधून भारतात आले होते.वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून त्यांनी बालकलाकार म्हणून काम करायला सुरुवात केली होती.त्यांना लहानपणापासून नृत्याची आवड होती.विशेष म्हणजे त्यांनी नृत्याचे कोणतेही शिक्षण घेतले नव्हते.नजराना हा त्यांचा पहिला सिनेमा होता.
मिस्टर इंडिया, चांदणी, बेटा, तेजाब, नगीना, डर, बाजीगर, अंजाम, मोहरा, याराना, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, परदेश, देवदास, लगान, सोल्जर, ताल, फिजा, साथिया, स्वदेश, कुछ ना कहो, वीर जारा, डॉन, फना, गुरु, नमस्ते लंदन, जब वी मेट, एजेंट विनोद, राउडी राठोड़, एबीसीडी, तनू वेड्स मनु रिटर्न्स, मणिकर्णिका यासारख्या अनेक चित्रपटातील गाण्यातील कलाकारांना नृत्याचे प्रशिक्षण दिले आहे.बॉलिवूडमध्ये नृत्य दिग्दर्शन करणाऱ्या कलावंतांमध्ये सरोज खान यांच्याकडे आदराने बघितले जाते.
दरम्यान, माधुरीच्या एक-दोन-तीन या नृत्यामुळे सरोज खान अधिक लोकप्रिय झाल्यात.अभिनेत्री माधुरी दीक्षित त्यांची आवडती शिष्या होती.चार दशकांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत सरोज खान यांच्याकडे २ हजारांहून अधिक गाण्यांच्या नृत्यदिशाचे श्रेय आहे.कोरिओग्राफीच्या कलेमुळे सरोज खान यांना ३ वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.संजय लीला भन्साळी यांच्या ‘देवदास’ चित्रपटात, डोला-रे-डोला या गाण्यासाठी नृत्यदिग्दर्शनासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तसेच माधुरी दीक्षित यांच्या ‘तेजाब’ या चित्रपटाचं गाणं एक-दोन-तीन आणि २००७ मधील ‘जब वी मेट’ या गाण्याचे ‘ये इश्क’ या गाण्यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.














































































