Last Updated on 09 Mar 2025 8:02 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली : संभाव्य महापुराला समर्थपणे तोंड देता यावे यासाठी स्थानिक नागरिक व शासकीय कर्मचाऱ्यांना एनडीआरएफकडून नुकतेच आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण बहे (ता. वाळवा) येथील कृष्णा नदीपात्रात देण्यात आले.
सांगली जिल्ह्याला २०१९ मध्ये महापुराचा मोठा फटका बसला होता. या वेळी कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणीपातळीत अचानकपणे वाढ झाल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. या महापुराचा अनुभव लक्षात घेता प्रशासनाने आपत्तीपूर्वीच आपत्ती आल्यानंतर कोणती काळजी घ्यावी, याचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन संभाव्य आपत्ती येणाऱ्या ठिकाणी सुरू केले आहे.

त्याअंतर्गत आज येथील बहे पुलाजवळ कृष्णा नदीपात्रात राष्ट्रीय आपत्ती दलाच्या पथकाने आपत्ती निवारणासंदर्भातील प्रात्यक्षिके सादर केली. आपत्ती काळात मदतीसाठी पाण्यात जाऊन लोकांचा बचाव कसा करावा, पुरात बुडणाऱ्यांना पोहून कसे बाहेर काढावे, बोट कशी चालवावी आदींचे प्रशिक्षण आज देण्यात आले.

प्रांताधिकारी अर्जुन श्रीनिवास, तहसीलदार सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार धनश्री यादव यांनी यावेळी प्रशिक्षणाबाबत माहिती दिली. यावेळी मंडळ अधिकारी उषा गवळे, ग्राम महसूल अधिकारी अविनाश पाटील यांनी नियोजन केले तसेच नदीकाठच्या गावातील सर्व तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, कोतवाल, पोलीस पाटील तसेच नागरिक उपस्थित होते. महसूल सहाय्यक बंडा कदम, महसूल सेवक प्रताप मोरे आदी उपस्थित होते.














































































