Last Updated on 19 Oct 2021 12:15 AM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई :
प्रसिद्ध भारतीय कार निर्माता कंपनी टाटाची मायक्रो एसयूव्ही टाटा पंच लॉन्च करण्यात आली आहे. कंपनीची ही सर्वात लहान आणि स्वस्त SUV आहे. टाटा पंचचा लूक आणि फीचर्सची माहिती कंपनीने शेअर केली आहे. कारची किंमत देखील जाहीर करण्यात आली आहे.
टाटा मोटर्सने दिवाळीपूर्वी आपली सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही टाटा ‘पंच’ लाँच केली. कंपनीने ५.४९ लाख रुपये टाटा पंचची सुरुवातीची किंमत ठेवली आहे. ४ ऑक्टोबर रोजी कंपनीने अधिकृत बुकिंग सुरु केले होते. ग्लोबल एनसीएपी क्रॅश टेस्टमध्ये या कारला प्रौढ सुरक्षेच्या दृष्टीने पंचतारांकित रेटिंगही मिळाली आहे. आता बाजारात सणासुदीच्या काळात कार खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांना दुसरा पर्याय मिळेल. कंपनीने दावा केला आहे की ती मॅन्युअल ट्रान्समिशनवर १८.९७ kmpl आणि AMT वर १८.८२ kmpl चे मायलेज देईल.
कंपनीच्या ALFA (Agile Light Flexible Advanced) प्लॅटफॉर्मवर टाटा पंच विकसित करण्यात आली आहे. त्याच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाले तर यात १.२ लीटर ३ सिलेंडर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे, जे ८५ bhp पॉवर आणि ११३ Nm टॉर्क जनरेट करते. हे ५ स्पीड मॅन्युअल आणि एएमटी ट्रान्समिशन पर्यायांसह दिले जाते. टाटा पंचला इको आणि सिटी सारखे २ ड्रायव्हिंग मोड देखील मिळतात.
टाटा पंचचे बाह्य आणि आतील भागही नेत्रदीपक आहेत. त्याचा मागील आणि पुढचा लुक बर्यापैकी मस्कुलर आहे, म्हणून तो आकाराने लहान असला तरी तो खूप शक्तिशाली दिसतो. फीचर्सविषयी बोलायचे झाले तर, टाटा पंचमध्ये ७-इंच हर्मन इन्फोटेनमेंट सिस्टम, ७-इंच TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, iRA कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, ९० डिग्री उघडणारे दरवाजे, ऑटो हेडलॅम्प, रेन सेन्सिंग वायपर, क्रूज कंट्रोल, १६-इंच डायमंड कट अॅलॉय व्हील आहेत.
सर्वात सुरक्षित कार
ही देशातील सर्वात सुरक्षित कार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. ग्लोबल एनसीएपी क्रॅश टेस्टमध्ये या कारला 5 रेटिंग देण्यात आले आहे. रेटिंगच्या बाबतीत भारतातील सर्व कारमध्ये या कारला सर्वोत्तम रेटिंग देण्यात आले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने या कारला 17 पैकी 16.45 गुण मिळाले आहेत. चाइल्ड सेफ्टीच्या बाबतीतही या कारला 49 पैकी 40.89 गुण मिळाले आहेत. कारमध्ये ड्युअल एअरबॅग, एबीएस, फ्रंट फॉग लॅम्प, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, पंक्चर रिपेअर, रियर डिफॉगर इत्यादी फीचर देण्यात आले आहेत.














































































