Last Updated on 21 Jun 2020 5:07 PM by
चवीला आंबट, तुरट आणि थोडासा गोड असा आवळा अनेकांना आवडतो. पूर्वी शाळेजवळ चिंचा-कैरी विकणाऱ्यांकडे आवळा हा आवर्जुन असायचा. त्यामुळे शाळेतील लहान मुलं हमखास आवळा खायचे.परंतु आता ते प्रमाण कमी झालं आहे.खरे तर आवळ्याचे प्रत्येकाने सेवन केले पाहिजे. आवळ्याचे अनेक फायदे आहेत.

दीर्घायुष्य लाभण्यासाठी आवळ्याचा आहारात आणि औषधी द्रव्य म्हणून उपयोग करतात.आवळ्यामध्ये ‘क’ जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असते. आवळ्याचे ‘पांढरे आवळे’ आणि ‘रान आवळे’ असे दोन प्रमुख प्रकार आहेत.आयुर्वेदामध्ये आवळ्याला अत्यंत श्रेष्ठ मानले आहे.आवळ्याच्या सेवनाने शरीर शुद्ध होऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढते.आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी रोज आवळ्याचं सेवन करणे आवश्यक आहे.तुम्ही आवळा पावडर,मोरावळा यासारखे पदार्थ तयार करून तुम्ही सहा महिने आवळा रोज सकाळी खाऊ शकता.आवळा हा उपाशी पोटी खाल्ला तर अधिक लाभदायी असतो.
आवळा खाण्याचे हे आहेत फायदे
१. डोकं शांत राहते. तसेच केसांच्या तक्रारीही दूर होतात.केस गळत असतील तर आवळ्याच्या तेलाने केसांच्या मुळाशी मालिश करावी.
२. ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी सकाळी ‘मोरावळा’ खाल्ल्यास फायदेशीर ठरेल
३. लघवी साफ न होणे, आम्लपित्त, चक्कर येणे, पोट साफ न होणे अशा अनेक तक्रारींवर आवळा अत्यंत गुणकारी आहे.
४. नियमितपणे आवळा खाल्ल्यास किंवा आवळ्याच्या रसाचं सेवन केल्यास शरीरातील रक्ताभिसरणाचे कार्य सुरळीत होते.
५. आवळ्यामुळे स्मरणशक्ती चांगली होते.त्यामुळे लहान मुलांना आवळा द्यावा.
६. आवळ्यात ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्यामुळे त्वचा रोगावर आवळा उत्तम औषध आहे.
७. आवळ्याचा रस खडीसाखरेबरोबर दिला असता डोकेदुखी,पोट,छाती व गळ्यातील आग,चक्कर तसेच अम्लपित्तामुळे होणारी उलटी व इतर लक्षणे कमी होतात.
८. हाडांच्या मजबुतीसाठी आणि पोटाच्या विकारांसाठी तुम्ही कोमट पाण्यात आवळा पावडर घालून रोज सकाळी घेऊ शकता. याशिवाय आवळा पावडर भिजवून ती केसांनाही लावली जाते.
९. लहान मुलांना मुरांबा किंवा मोरावळा स्वरूपात पोळीसोबत खाण्यासाठी आवळा दिल्यास मुलंही आवळा खातात.
१०. रोज आवळ्याची एक फोड खायला हवी.यामुळे तुम्ही निरोगी राहण्यास मदत होते.














































































