Last Updated on 07 Aug 2021 6:52 PM by Sanjay Patil/Adhorekhit
टोकियो : टोकियो आलिम्पिकमध्ये भारताला सहावं पदक आज मिळालं आहे. कुस्तीपटू बजरंग पुनियाने 65 किलो फ्री स्टाईल कुस्तीमध्ये भारतासाठी कांस्य पदक पटकावलं आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू बजरंग पुनियाने कझाकस्तानचा पैलवान डाऊलेट नियाजबेकोव वर 8-0 ने मात केली.
भारताचा पैलवान बजरंग पुनियाने कझाकिस्तानच्या नियाझबेकोवर सुरुवातीपासून आघाडी घेतली. त्याने आपले एक एक डाव टाकत 2 पॉईंट घेतले. 65 किलो वजनी गटात कांस्यपदकाची लढाई सुरु असताना, पुनियाने आपली आगेकूच कायम ठेवली. दोन पॉईंटची आघाडी असताना, त्याने आणखी एक डाव टाकून 2 पॉईंट घेतले. मग त्याने आक्रमक पवित्रा घेत आणखी 2 पॉईंट घेऊन, आपली आघाडी 6-0 अशी केली. अखेर बजरंग पुनियानं मॅच 8-0 अशी जिंकत भारताला कांस्य पदक मिळवून दिलं.
कुस्तीच्या 65 किलो वजनी गटात भारताचा आघाडीचा पैलवान बजरंग पुनिया पराभूत झाला होता. अझरबैजानचा हाजी अलीयेब याने पुनियाला 12-5 च्या फरकाने मात दिली होती. पण बजरंगनं आजच्या सामन्यात विजय मिळवला.
अर्जुन पुरस्कार आणि पद्मश्रीनं गौरव
25 वर्षीय बजरंग आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्तीमध्ये चमकदार कामगिरी करत आहे. जागतिक क्रमवारीत तो अव्वल स्थानावर आहे. नुकतंच त्याने आशियाई कुस्ती चॅम्पियनशीपमध्ये त्याने 65 किलो वजनी गटात सुवर्ण पदकाची कमाई केली आहे, तर राष्ट्रकुल स्पर्धेतही त्याने सुवर्ण पटकावलं होतं. केंद्र सरकारने त्याचा अर्जुन पुरस्कार आणि यंदा ‘पद्मश्री’ने गौरव केला आहे.














































































