Last Updated on 01 Feb 2025 1:04 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मंत्री एकनाथ शिंदे यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा कट रचण्यात आला. या कटाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने मुंबई पोलिस सह आयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक अर्थात एसआयटीची स्थापना केली आहे. गृहविभागाने शुक्रवारी याबाबतचा शासन निर्णय (जीआर) जारी केला आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना खोट्या प्रकरणात अडकवून अटकेत टाकण्याचा कट रचण्यात आला होता. यासाठी पोलिस अधिकाऱ्यांना कामास लावण्यात आले होते, असा आरोप करत चौकशी करण्याची मागणी अलीकडेच पार पडलेल्या नागपूरातील विधिमंडळच्या हिवाळी अधिवेशनात भाजप नेते, आमदार प्रवीण दरेकर यांनी केल होता. त्यावर, या कटाचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले होते.
त्यानुसार, मुंबई पोलिस दलातील कायदा-सुव्यवस्थाचे सह आयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. चौधरी यांच्यासह राज्य राखीव पोलिस दल मुंबईचे उपमहानिरिक्षक राजीव जैन, मुंबईतील पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे आणि मुंबईतील सहायक पोलिस आयुक्त आदिकराव पोळ यांचा या समितीत समावेश करण्यात आला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिंदे-फडणवीसांच्या अटकेसाठी रचण्यात आलेला कट तसेच त्यासाठी खोट्या गुन्ह्याच्या तपासाचा रचलेला बनाव, याची या एसआयटीमार्फत चौकशी केली जाणार आहे. याबाबतच्या तक्रारीच्या अनुषंगाने तपास करून त्याबाबत शासनाला शिफारस करण्याच्या सूचना विशेष तपास पथकाला देण्यात आल्या आहेत.
तसेच, या प्रकरणात विधिमंडळात झालेल्या चर्चेदरम्यान विविध आमदारांनी केलेले दावे, उपस्थित केलेले मुद्दे तपासादरम्यान एसआयटीने विचारात घ्यावे. तसेच, आमदारांना याप्रकरणी आणखी काही मुद्दे मांडायचे असतील, पुरावे सादर करायचे असतील तर त्यांना ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. तर, या एसआयटीला आवश्यक मनुष्यबळ आणि सुविधा पुरविण्याची जबाबदारी मुंबई पोलिस आयुक्तांवर सोपविण्यात आली आहे.
Courtesy: Prasar Bharati













































































