Last Updated on 30 Nov 2021 10:54 PM by Sanjay Patil/Adhorekhit
ना. बच्चू कडू यांची खंत : इस्लामपुरात ‘आपली माणसं’ च्या वतीने घरकूल अर्पण
सांगली ।
पेटविणारी माणसं खूप ताकदीने एकत्र येतात.पण घरं बांधताना माणसांचा हात आखडता होतो.मात्र कोणतीही जात,धर्म न पाहता गरजू कुटुंबाला घरकूल बांधून देण्याचा ‘आपली माणसं फाऊंडेशन’चा उपक्रम समाजातील इतर संस्था व व्यक्तींना प्रेरणादायी आहे,असे प्रतिपादन राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी केले.
इस्लामपूर येथील दिव्यांग नानासाहेब पांडुरंग महापुरे यांच्या कुटुंबासाठी ‘आपली माणसं फाऊंडेशन’च्या पुढाकाराने घरकुल बांधले आहे.त्याचा सोमवारी अर्पण सोहळा ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या हस्ते झाला.याप्रसंगी प्रांताधिकारी संपत खिलारी,तहसीलदार प्रदीप उबाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी स्वागत प्रा. डॉ. अशोक शिंदे यांनी केले.कमिटी अध्यक्ष अॅड. विकास पाटील यांनी फाऊंडेशनच्या उपक्रमांचा आढावा घेतला.

शहर परिसरातील अनेक दानशूर व्यक्तींनी या घरकुलासाठी भरीव सहाय्य केले आहे अशा दानशूर व्यक्तींना कृतज्ञता प्रमाणपत्र पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आले.फाऊंडेशनचे प्रवीण महाराज,मनिष जाधव,डॉ. कुमार वर्णे,डॉ. अनिल माळी,डॉ. अमित पाटील,अॅड. विशाल पाटील,विक्रम सावंत,दीपक साळुंखे,कैलास महापुरे,आदीनाथ चौधरी,मुकेश अग्रवाल,सुनीता जाधव,प्रहार संघटनेचे दिग्विजय पाटील आदींची उपस्थिती होती.समारंभाआधी शहरातील साठेनगरमध्ये बांधलेल्या घरकुलाचा अर्पण सोहळा ना. बच्चू कडू यांच्या हस्ते झाला.

आपली माणसं
जी माणसं आपल्यासोबत दु: खाच्यावेळी असतात,त्यांना आपली माणसं म्हणतात.मात्र आपल्या जातीतली,धर्मातली जी माणसं असतात,त्यांना आपली माणसं म्हटले जाते; हे आपल्या देशाचं दुर्दैव आहे, अशीही खंत व्यक्त करून बच्चू कडू यांनी इस्लामपूर येथील ‘आपली माणसं फाऊंडेशन’चा गौरव केला.
















































































