Last Updated on 06 Aug 2020 4:04 PM by
मुंबई : दैनिक पुण्यनगरीचे संस्थापक-संपादक मुरलीधर अनंता उर्फ बाबा शिंगोटे यांचे आज निधन झाले.त्यांचे जन्मगाव असलेल्या गायमुख वाडी तालुका जुन्नर येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.१९९४ मध्ये मुंबई चौफेर नावाचे सायं दैनिक त्यांनी सुरू केले. यानंतर दैनिक आपला वार्ताहर, दैनिक यशोभुमी, दैनिक कर्नाटक मल्ला, तामिळ टाईम्स, हिंदमाता ही दैनिके सुरु केली.
बाबांचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालूक्यातील उंब्रज या गावी ७ मार्च १९३८ ला झाला होता. इयत्ता चौथी शिक्षण झालेल्या बाबांनी शिक्षण अर्धवट सोडल्यानंतर नोकरी-व्यवसायासाठी मुंबई गाठली. त्या ठिकाणी सुरुवातीला फळ विक्री त्यानंतर बुवाशेठ दांगट यांच्याकडे वृत्तपत्र टाकण्याचे काम सुरू केले होते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी मुंबईतल्या फाऊंटन परिसरात आंदोलन झाले होते, त्याचे बाबा साक्षीदार होते.
वृत्तपत्र विकताना सर्वसामान्यांना समजेल आणि वाचता येईल अशा भाषेतले वृत्तपत्र काढण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले होते. १९९४ मध्ये मुंबई चौफेर नावाचे टॅब्लॉईड सायंदैनिक सुरू केले. यानंतर दैनिक आपला वार्ताहर, दैनिक यशोभुमी, दैनिक कर्नाटक मल्ला, तामिळ टाईम्स, हिंदमाता ही दैनिके सुरु केली. यातल्या दैनिक पुण्यनगरीची मुहूर्तमेढ १९९९ मध्ये रोवली. मराठी भाषिक वृत्तपत्रांसोबत इतर भाषिक दैनिक प्रकाशित करणारे मुरलीधर शिंगोटे हे एकमेव होते.ही दैनिके त्यांनी कोणतेही भांडवल नसताना सुरु केली.त्यातील पुण्यनगरी हे दैनिक महाराष्ट्रात लोकप्रिय ठरले.अत्यल्प शिक्षण आणि पत्रकारितेची कोणतेही पार्श्वभूमी नसताना केवळ वृत्तपत्र वितरण व्यवसायातील अनुभवाच्या जोरावर बाबांनी वृत्तपत्र काढण्याचे धाडस केले आणि ते यशस्वी करुन दाखवले.त्यांनी अल्पावधीत स्वतंत्र वृत्तपत्र समुह सुरु केला.
राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी बाबा शिंगोटे यांना श्रद्धांजली वाहिली
‘वृत्तपत्रसृष्टीतील प्रेरणादायी प्रवास थांबला’ – मुख्यमंत्री
वृत्तपत्र विक्रेता ते वृत्तपत्र समुहाचा सर्वेसर्वा असा प्रेरणादायी प्रवास पुण्यनगरी वृत्त समुहाचे संस्थापक-संपादक मुरलीधर शिंगोटे यांच्या निधनामुळे थांबला आहे. त्यांची मराठी वृत्तपत्र क्षेत्रातील वाटचाल यापुढेही अनेकांसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरेल, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रध्दांजली वाहिली आहे. शिंगोटे बाबांकडे कष्टाळू वृत्ती होती. मुंबईत येऊन फळ विक्रेता, वृत्तपत्र विक्रेता अशी कष्टाची काम करतानाही शिंगोटे बाबांनी स्वतःचे वृत्तपत्र असावे, असा ध्यास घेतला. ते संयुक्त महाराष्ट्र चळवळीचेही साक्षीदार होते. त्यांनी सर्वसामान्यांना समजेल आणि आवडेल अशा भाषेत वृत्तपत्र प्रकाशित करणे सुरु केले. त्यातूनच त्यांच्या वृत्तपत्र समुहाचा विस्तार झाला. मराठी सोबतच अन्य भाषांत दैनिक प्रकाशित करणारे ते एकमेव मराठी होते. त्यांचा वृत्तपत्र विक्रेता ते वृत्त समुहाचा सर्वेसर्वा असा प्रवास प्रेरणादायी असाच आहे. त्यांची वाटचाल यापुढेही अनेकांसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरेल. त्यांच्या निधनामुळे वृत्तपत्रसृष्टीतील प्रेरणादायी प्रवास थांबला, असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
मुरलीधर शिंगोटे यांचा ‘वृत्तपत्र विक्रेता ते वृत्तसमूहाचे प्रमुख’ हा प्रवास प्रेरणादायी – उपमुख्यमंत्री अजित पवार
दैनिक ‘पुण्य नगरी’ वृत्तपत्र समुहाचे संस्थापक, संपादक मुरलीधर शिंगोटे यांचा वृत्तपत्र विक्रेता ते वृत्तपत्र समुहाचे प्रमुख हा प्रवास प्रेरणादायी आहे. त्यांच्या निधनाने मराठी वृत्तपत्रसृष्टीची मोठी हानी झाली आहे.जुन्नर तालुक्यातील उंब्रज सारख्या छोट्या गावातील सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या मुरलीधर शिंगोटे यांनी वृत्तपत्र विक्रेता म्हणून आपल्या व्यवसायाला सुरुवात केली. वृत्तपत्र विक्रेता ते वृत्तसमुहाचे प्रमुख हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांनी आयुष्यभर सामान्य, कष्टकरी वाचकांशी बांधिलकी जपली. पुण्य नगरी, मुंबई चौफेर, आपला वार्ताहर, कर्नाटक मल्ल्या, तमिळ टाईम्स, यशोभूमी, हिंदमाता या वृत्तपत्रांच्या माध्यमातून त्यांनी मराठी, हिंदी, तमिळ, कन्नड या चार भाषिक वाचकांना जोडले. मुरलीधर शिंगोटे यांनी कोणत्याही एका राजकीय विचारधारेकडे न झुकता कायम तटस्थ भूमीका ठेवली. त्यांचे यश आणि वेगळेपण मराठी वृत्तपत्र सृष्टीसाठी आश्चर्यच मानावे लागेल.
शून्यातून एक व्यापक परिवार उभारण्याचे काम– देवेंद्र फडणवीस
दै. पुण्यनगरीचे संस्थापक-संपादक श्री मुरलीधर शिंगोटे यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय वाईट वाटले.परिश्रमांनी एखादा माणूस आपला प्रवास कुठवर नेऊ शकतो,याचे आदर्श उदाहरण म्हणजे बाबा शिंगोटे यांचे आयुष्य.शून्यातून एक व्यापक परिवार उभारण्याचे काम त्यांनी केले.जेमतेम चौथीपर्यंत शिक्षण,व्यवसायासाठी मुंबई गाठणे,फळविक्री,वर्तमानपत्रांचे वितरक ते पुण्यनगरीचे मालक.या समूहात मुंबई चौफेर,आपला वार्ताहर,यशोभूमी,कर्नाटक मल्ला अशी इतरही वृत्तपत्रे आहेत.श्री मुरलीधर शिंगोटे यांना माझी विनम्र श्रद्धांजली.परिवाराच्या दु:खात मी सहभागी आहे!,असे ट्विट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
बाबांचा प्रवास थक्क करणारा आणि प्रेरणादायी-ना.धनंजय मुंढे
शून्यातून विश्व निर्माण करणारे पुण्यनगरी वृत्तसमूहाचे संस्थापक – संपादक मुरलीधर (बाबा) शिंगोटे यांच्या निधनाने वृत्तसृष्टीतील एक दृष्टे व्यक्तिमत्व हरवले आहे. वृत्तपत्र वितरक ते संपादक एवढं विश्व उभं करणाऱ्या बाबांचा प्रवास थक्क करणारा आणि प्रेरणादायी आहे. भावपूर्ण श्रद्धांजली!
महाराष्ट्रातील पत्रकारितेच्या क्षेत्रात मोलाचे योगदान-मा.खा.राजू शेट्टी
वृत्तपत्र विक्रेता ते दैनिक पुण्यनगरीचे संस्थापक असा प्रवास करून महाराष्ट्रातील पत्रकारितेच्या क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे मुरलीधर (बाबा) शिंगोटे यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. त्यांचा परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.








































































