Last Updated on 20 Nov 2021 6:20 AM by Sanjay Patil/Adhorekhit
इस्लामाबाद ।
पाकिस्तानात वाढत्या लैंगिक अत्याचारांना रोखण्यासाठी एक कठोर कायदा करण्यात आला आहे.पाकिस्तानच्या संसदेने लैंगिक शोषणासंदर्भात एक विधेयक पास केले आहे.या कायद्याअंतर्गत लैंगिक शोषण करणाऱ्या दोषीला औषध देऊन नपुंसक बनवले जाणार आहे.देशात महिला आणि मुलींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या वाढत्या प्रकरणांमुळे जनतेमध्ये मोठा आक्रोश आहे.जनतेच्या मनातील रोष लक्षात घेऊन पाकिस्तान सरकारने हे पाऊल उचलत संसदेत लैंगिक अत्याचारासंदर्भात हे विधेयक मांडले होते.संसदेने या विधेयकाला मंजूरी देत त्याचा नवीन कायदा केला आहे.
पाकिस्तानात गेल्या वर्षी बलात्काराच्या गुन्हेगारांना नपुंसक बनवण्याचा एक अध्यादेशही आणला गेला होता. जवळपास एका वर्षानंतर या अध्यादेशातल्या तरतुदींना विधेयक म्हणून सादर केले गेले.बुधवारी,17 नोव्हेंबर, 2021ला पाकिस्तानच्या संसदेच्या संयुक्त सत्रात हे विधेयक पारितही करण्यात आले.
रासायनिक पद्धतीने करणार नपुंसक (केमिकल कॅस्ट्रेशन)
या विधेयकात म्हटले आहे की,केमिकल कॅस्ट्रेशन (रासायनिकरित्या नपुंसक बनवणे) ही एक अशी प्रक्रिया आहे जी पंतप्रधानांनी बनवलेल्या नियमांतर्गत मंजूर केलेली आहे.यात पुरुषाला आयुष्यात कधीच सेक्स करता येणार नाही,सेक्स करायला तो असमर्थ असेल अशी तजवीज केली जाते.यासाठी कोर्ट काही औषधे वापरायची परवानागी देते जी मेडिकल बोर्डाने मंजूर केलेली असतात.कायद्यामध्ये ही तरतूद आहे की घटनेची तक्रार दाखल झाल्यानंतर सहा तासाच्या आत पीडितेची तपासणी होईल.
केमिकल कॅस्ट्रेशन म्हणजे काय?
केमिकल कॅस्ट्रेशनमध्ये पुरुषाची कामवासना कमी केली जाते आणि रसायनांद्वारे त्यांच्या शरीरातील टेस्टोस्टेरॉन संप्रेरक कमी केले जाते.हे संप्रेरक पुरुषांमधील मुख्य लैंगिक हार्मोन असते.1940 च्या दशकापासून लैंगिक गुन्हेगारांविरुद्ध शिक्षा म्हणून या प्रकारच्या कॅस्ट्रेशनचा वापर केला जात आहे. 2003 मध्ये,संशोधक चार्ल्स एल. स्कॉट आणि ट्रेंट होमबर्ग म्हणाले,पुरुषांमधील मानसिक लैंगिक वर्तन कमी करण्यासाठी संप्रेरक-आधारित औषधांचा वापर 1944 मध्ये प्रथम उल्लेखला गेला आहे.










































































