Last Updated on 15 Aug 2021 11:46 AM by Sanjay Patil/Adhorekhit
प्रधानमंत्री गति शक्ति योजना 100 लाख कोटी रुपयांपेक्षाही अधिक मोठी
लेकींसाठी सैनिक स्कूल उघडण्याची घोषणा
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग आठव्यांदा लाल किल्ल्यावरुन भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा फडकावला. ध्वजारोहणाच्या नंतर त्यांनी देशाला संबोधित देखील केलं. यावेळी त्यांनी काही महत्वाच्या आणि मोठ्या घोषणा केल्या. गती शक्ति योजना लवकरच लॉन्च केली जाणार आहे. ही योजना 100 लाख कोटी रुपयांपेक्षाही अधिक मोठी योजना असेल. यात लाखो युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या जातील. ही योजना देशाचा मास्टर प्लान बनेल जो इंफ्रास्ट्रक्चरचा पाया असेल,अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग आठव्यांदा लाल किल्ल्यावरुन भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा फडकावला. ध्वजारोहणाच्या नंतर त्यांनी देशाला संबोधित देखील केलं. यावेळी त्यांनी काही महत्वाच्या आणि मोठ्या घोषणा केल्या.
गतिशक्ती योजनेत काय असणार?
प्रधानमंत्री मोदी यांनी सांगितलं की, भारतात येणाऱ्या काळात गतिशक्ती योजनेसाठी एक राष्ट्रीय मास्टर प्लान देशासमोर ठेवला जाईल. 100 लाख कोटींपेक्षा अधिक किमतीची ही योजना असणार आहे. या योजनेच्या अंतर्गत लाखो लोकांना रोजगार मिळणार आहे. हा पूर्ण देशासाठी मास्टर प्लान असेल, जो प्लान देशात हॉलिस्टिक इंफ्रास्ट्रक्चरचा पाया रचणार आहे. सध्या दळणवळणाच्या साधनांमध्ये ताळमेळ नाही, ही योजना यावर देखील काम करणार आहे.
लेकींसाठी उघडल्या जातील सर्व सैनिक स्कूल
मोदी म्हणाले की, खेळांपासून सर्वच ठिकाणी मुली कमाल करत आहेत. आज भारताच्या मुली त्यांचे स्थान घेण्यासाठी उत्सुक आहेत. रस्त्यापासून कामाच्या ठिकाणी, महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना, सन्मान असावा, यासाठी प्रशासन, पोलिस, नागरिकांनी आपली जबाबदारी पार पाडावी. हा संकल्प स्वातंत्र्याच्या 75 वर्षांचा संकल्प बनवायचा आहे. मला लाखो मुलींकडून असे संदेश येत असत की सैनिक शाळेत शिकू इच्छितात. अडीच वर्षांपूर्वी मिझोरामच्या सैनिक शाळेत मुलींना प्रवेश देण्याचा प्रयोग झाला. आता हे ठरवले गेले आहे की देशातील सर्व सैनिक शाळा देखील देशातील मुलींसाठी उघडल्या जातील.
ऑलिम्पिक खेळाडूंच्या सन्मानार्थ वाजवल्या टाळ्या
मोदी म्हणाले, ‘युवा पिढीचे खेळाडू आणि ऑलिम्पिकमध्ये भारताला गौरव मिळवून देणारे आपले खेळाडू या कार्यक्रमात उपस्थित आहेत. मला देशवासीयांना आणि भारताच्या कानाकोपऱ्यात उपस्थित लोकांना काही क्षण टाळ्या वाजवून आपल्या खेळाडूंचा सन्मान करावा.
भारताच्या खेळांचा सन्मान, भारताच्या तरुण पिढीचा सन्मान, भारताचा गौरव करणाऱ्या युवकांचा सन्मान, कोट्यावधी देशवासी आज देशाच्या तरुणांचा जोरदार टाळ्यांच्या गजरात सन्मान करत आहेत. विशेषतः खेळाडूंवर आपण अभिमान बाळगू शकतो की त्यांनी केवळ मने जिंकली नाहीत, तर त्यांनी भारताच्या तरुण पिढीला आणि येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देण्याचे मोठे काम केले आहे.
गरीबांना पौष्टिक तांदूळ मिळणार
गरीब मुलांमधील कुपोषणाबद्दल चिंता व्यक्त करताना पंतप्रधान म्हणाले की, देशातील प्रत्येक गरिबांना पोषण देणे हे देखील सरकारची प्राथमिकता आहे. गरीब मुलांमध्ये कुपोषण आणि पौष्टिक पदार्थांचा अभाव विकासात अडथळा आणतो. ठरवण्यात आले आहे की, सरकार जे तांदूळ त्याच्या वेगवेगळ्या योजनांखाली गरीबांना देते, ते पोषणयुक्त करेल. रेशन दुकाने, मध्यान्ह भोजन, प्रत्येक योजनेअंतर्गत उपलब्ध तांदूळ 2024 पर्यंत पोषकयुक्त केले जातील.
ऑक्सिजन प्लांट वाढवले जातील
मोदी म्हणाले की, सरकारने वैद्यकीय शिक्षणात सुधारणा केल्या, प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा सुधारल्या. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत देशातील प्रत्येक गावाला दर्जेदार आरोग्य सुविधा दिल्या जात आहेत. गरीब आणि मध्यमवर्गीयांना स्वस्त औषध दिले जात आहे. 75,000 हून अधिक आरोग्य आणि निरोगी केंद्रे उभारण्यात आली आहेत. चांगली रुग्णालये आणि आधुनिक प्रयोगशाळांच्या नेटवर्कवर काम केले जात आहे. लवकरच देशातील हजारो रुग्णालयांमध्ये त्यांचे स्वतःचे ऑक्सिजन प्लांट देखील असतील.
पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू, देशाला एकजूट राष्ट्र म्हणून आकार देणारे सरदार वल्लभभाई पटेल किंवा भारताला भविष्याचा मार्ग दाखवणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर अशा प्रत्येक महान व्यक्तित्वांचे स्मरण देश करत आहे. देश या सर्वांचा ऋणी आहे. आजपासून प्रारंभ होत पुढील 25 वर्षे होणारा विकासाचा प्रवास हा भारताच्या सृजनाचा अमृत कालखंड आहे. या अमृत कालखंडात आपल्या संकल्पांची पूर्तता होईल, आपल्याला स्वातंत्र्याच्या 100 वर्षांपर्यंत नेईल.
कोरोनाच्या जागतिक महामारीमध्ये आपले डॉक्टर, आपल्या परिचारिका, आपले निमवैद्यकीय कर्मचारी, सफाई कामगार, लस तयार करण्यामध्ये गुंतलेले शास्त्रज्ञ असोत, सेवा करणारे नागरिक असोत, हे सर्वच वंदन करण्यायोग्य आहेत. केंद्र असो किंवा राज्य सर्व सरकारी कार्यालयांनी आपल्याकडील नियम आणि प्रक्रियांची माहिती घ्या आणि अडथळे दूर करा.
नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशनची घोषणा, भारताची ऊर्जा क्षेत्रातील मोठी प्रगती, जगात स्वच्छ उर्जासाठी भारताला ओळखलं जाईल. भारतीय स्वातंत्र्याच्या 100 व्या वर्षापर्यंत देशाला ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण करणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. तसेच या दशकापर्यंत 450 गिगावॅट अपारंपारिक उर्जा निर्मितीचं लक्ष्य ठेवलं आहे.
मी कर्मावर विश्वास ठेवतो. माझा देशातील तरुणांवर, शेतकरी सर्वांवर विश्वास आहे. प्रत्येक लक्ष्य ते संपादन करु शकतात. आजपासून 25 वर्षांनी 2047 मध्ये जेव्हा 100 वर्ष पूर्ण होतील तेव्हा जे कोणी पंतप्रधान असतील ते आपल्या ते भाषणात ज्या गोष्टींचा उल्लेख करतील तो संकल्प आज देश करत आहे. हा माझा विश्वास आहे. 25 वर्षानंतर ध्वजारोहण करताना हीच गौरवगाथा गायली जाईल.
मला अनेक मुलींनी सैनिक स्कूलमध्ये शिक्षण मिळावं यासाठी विनंती केली. आम्ही मिझोरममध्ये प्रयोग केला होता. पण आता देशातील सर्व सैनिक शाळांमध्ये मुलींनाही प्रवेश दिला जाणार आहे. केंद्र सरकारने निर्णय घेतला असून आता मुलीही तिथे शिक्षण घेणार आहेत.
आज अनेक नवे स्टार्टअप येत आहेत. सरकार या स्टार्टअपसोबत उभी आहे. आर्थिक मदत, करात सूट असं सर्व काही केलं जात आहे. करोनाच्या काळात हजारो नवे स्टार्टअप उभे राहिले. यशस्वीपपणे वाटचाल सुरु आहे. यांची बाजारकिंमत हजार कोटींपर्यत पोहोचत आहे.
सबका साथ-सबका विकास-सबका विश्वास हा मंत्र घेऊन आमची वाटचाल सुरू आहे. आज लाल किल्ल्यावरून मी आवाहन करतो, सबका साथ-सबका विकास-सबका विश्वास आणि सबका प्रयास, आमच्या प्रत्येक उद्दिष्टाच्या प्राप्तीसाठी अतिशय महत्वाचे आहे
आज आपण गावांमध्ये झपाट्याने परिवर्तन होत असताना पाहात आहोत. आता गावांमध्ये ऑप्टिकल फायबर नेटवर्क, डेटा यांचे बळ पोहोचू लागले आहे, गावात देखील डिजिटल उद्योजक तयार होत आहेत
गावात आपल्या बचतगटांशी संबंधित 8 कोटीपेक्षा जास्त भगिनी आहेत, त्या एकापेक्षा एक उत्तम उत्पादने तयार करतात. या उत्पादनांना देशात आणि परदेशात मोठी बाजारपेठ मिळावी, यासाठी आता सरकार ई- कॉमर्स प्लॅटफॉर्म तयार करेल.














































































