Last Updated on 30 Nov 2021 5:36 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई ।
महागडे पेट्रोल आणि डिझेलपासून मुक्ती मिळवण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी मोठा निर्णय घेणार आहेत. सोमवारी एका सभेला संबोधित करताना ते म्हणाले की मी येत्या 2-3 दिवसांत कार निर्मात्यांना 100% बायो-इथेनॉलवर चालणारे इंजिन बनवण्यास सांगणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, इथेनॉलचा पुरवठा वाढवून लवकरात लवकर फ्लेक्स-इंधन इंजिन वाहने सादर करण्याचा सरकारचा विचार आहे. ते म्हणाले की 100% बायो-इथेनॉलवर चालणाऱ्या फ्लेक्स-इंधन वाहनांच्या रोलआउटमुळे इथेनॉलची मागणी तात्काळ 4 ते 5 पट वाढेल.
विशेष इंधन असलेली इंजिने लवकरच अनिवार्य होणार
पेट्रोल आणि डिझेलवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सरकारने नवा मार्ग शोधला असल्याचे परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते. ते म्हणाले होते की सरकार येत्या काही महिन्यांत फ्लेक्स इंधन इंजिन अनिवार्य करणार आहे. हा नियम सर्व प्रकारच्या वाहनांसाठी करण्यात येणार आहे. सर्व वाहन कंपन्यांना वाहनांमध्ये फ्लेक्स इंधन इंजिन वापरण्याचे आदेश दिले जातील.
भारतात फक्त तीन इथेनॉल स्टेशन
तीन इथेनॉल स्टेशन असलेले पुणे हे भारतातील एकमेव शहर आहे.या वर्षी 5 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन E-100 इथेनॉल वितरण केंद्र सुरू केले होते.तज्ज्ञांच्या मते पुण्यात प्रायोगिक प्रकल्पांतर्गत इथेनॉल इंधनावर आधारित काही वाहने चालवली जात आहेत.
इथेनॉलच्या वापरात ब्राझील प्रथम क्रमांकावर
ब्राझील हा जगातील सर्वात मोठा ऊस उत्पादक देश आहे. त्यामुळे ब्राझीलमध्ये इथेनॉल मोठ्या प्रमाणात तयार होते. ब्राझीलने 40 वर्षांपूर्वी इथेनॉलवर काम करण्यास सुरुवात केली आणि सध्या ब्राझीलने तेलाची आयात कमी केली आहे.











































































