Last Updated on 14 Mar 2025 4:42 PM by Sanjay Patil/Adhorekhit
पुणे : राज्यात शनिवारपासून गाय आणि म्हशीच्या दूध दरात प्रतिलिटर दोन रुपयांनी वाढ होणार आहे. दूध उत्पादक आणि प्रक्रिया कल्याणकारी संघाच्या सभासदांची बैठक आज कात्रज डेअरीमध्ये घेण्यात आली. त्यामध्ये एकमताने हा निर्णय झाला.
राज्यात या निर्णयाची अंमलबजावणी शनिवारपासून होणार आहे. या निर्णयानुसार प्रतिलिटर गायीच्या दुधाची विक्री 56 वरून 58 रुपये, तर म्हशीच्या दुधाची विक्री 72 वरून 74 रुपये होणार आहे. अशी माहिती दूध उत्पादक आणि प्रक्रिया कल्याणकारी संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के आणि मानद सचिव प्रकाश कुतवळ यांनी आज पुण्यात दिली.
पुण्यातील कात्रज दूध संघात पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.या बैठकीला दूध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिक संघटनेचे ४७ सदस्य उपस्थित होते. या बैठकीत गाय आणि म्हशीच्या दूध दरात प्रति लिटर दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये दूध भेसळ आणि पनीर भेसळ रोखण्यावर सविस्तर चर्चा झाली. भेसळ आणि शेतकऱ्यांचे थकीत अनुदान लवकरात लवकर मिळण्यासाठी दुग्ध व्यवसाय विकास मंत्री आणि आयुक्तांना भेटण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष गोपाळराव मस्के आणि मानद सचिव प्रकाश कुतवळ यांनी दिली.













































































