Last Updated on 28 Oct 2024 11:53 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । आनंद आणि उत्साहाचंपर्व असलेल्या दीपोत्सवाला आज वसुबारसेच्या पूजनाने प्रारंभ झाला. त्याला गोवत्स द्वादशी असंही म्हणतात. सवत्स धेनु अर्थातगाय आणि वासराची पूजा करून दिवाळीला घरोघरी सुरुवात झाली.
गाईला कामधेनू देखील संबोधिल्या जात असल्यानं या दिवशी तिची पंचोपचार पूजा करून तिला नैवेद्य अर्पण केला जातो. कुटुंबाचं कल्याण व्हावं , भरभराट व्हावी म्हणून भारतीय संस्कृतीत आजच्या दिवसाचं विशेष महत्व आहे. या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत आकाशदिवे, रोषणाईच्या माळा, आणि गृहसजावटीच्या साहित्यासह फटाके, फराळाच्या साहित्य खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.
येत्या रविवारपर्यंत चालणाऱ्या या प्रकाशोत्सवानिमित्त महाराष्ट्रात सर्वत्र चैतन्याचं वातावरण आहे. मनोवेधक रोषणाईनं बाजारपेठा सजल्या आहेत. आकाशकंदील, पणत्या, रांगोळ्या या बरोबरच कपडे, दागिने खरेदीसाठी लगबग दिसून येत आहे.
दरम्यान, महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राज्यातल्या जनतेला धनत्रयोदशी तसंच दीपावलीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.आजच्या वसुबारस तसंच उद्या असणाऱ्या धनत्रयोदशीपासून सुरू होणारी दिवाळीआनंद, समृद्धी आणि सुख शांती घेऊन येवो, असं राधाकृष्णन यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.










































































