Last Updated on 28 Aug 2024 2:12 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । आपला कॉलेज कॅम्पस किंवा आपल्या परिसरात आपली छेडछाड किंवा कोणाकडून गैरवर्तणूक होत असेल तर लगेच कॉलेजशी किंवा पोलिसांशी संपर्क साधा, संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल; असा इशारा पोलीस निरीक्षक संजय हारगुडे यांनी दिला.
इस्लामपूर येथील यशवंतराव चव्हाण विद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना, कॉमर्स विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्यावतीने “सोशल मीडिया, सामाजिक सुरक्षितता आणि विद्यार्थ्यांची जबाबदारी” या अनुषंगाने कार्यशाळेचे आयोजन केले होते. याप्रसंगी पोलीस निरीक्षक संजय हारगुडे बोलत होते. अध्यक्षस्थानी वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. अशोक शिंदे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून वाळवा तालुका शिक्षण संस्थेचे सहसचिव ॲड. धैर्यशील पाटील यांची उपस्थिती होती. प्रारंभी या उपक्रमाची भूमिका आपल्या स्वागत पर मनोगतात राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख डॉ. जी. के. किर्दत यांनी सांगितली. शारीरिक शिक्षण संचालक डॉ. हेमंत नारायणकर यांनी प्रास्ताविक केले.उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांचे स्वागत डॉ. अशोक शिंदे यांच्या हस्ते झाले.
हेही वाचा – Satara : कोयना धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवणार; धरणाची 100 टक्के भरण्याकडे वाटचाल
पोलीस निरीक्षक हारुगडे म्हणाले, फेसबुक, इंस्टाग्राम यासारख्या सोशल मीडियावर आपण अनोळखी व्यक्तींशी मैत्री करताना सजग राहावे, सोशल मीडियाद्वारे आर्थिक गुन्हे घडण्याचे प्रमाण वाढत असून व मोठी फसवणूक होण्याचे तसेच अनैतिक बाबतीत देखील अनेक गंभीर प्रकार घडत आहेत. त्यांनी याबाबत सजग व सावध राहून याबाबत काही शंका किंवा काही तक्रारी असतील तर पोलिसांशी त्वरित संपर्क करा, आपल्या पालकांना विश्वासात घ्या, शिक्षक किंवा पोलिसांकडे विनयभंग, छेडछाड, गैरवर्तणूक याबाबत लगेच संपर्क साधा, असेही आवाहन करून त्यांनी विद्यार्थ्यांच्या तक्रारी आल्यास त्यावर सत्वर आणि कठोर कारवाईची आश्वासन हारगुडे यांनी दिले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वरुटे, पोलीस उपनिरीक्षक दिनकर महापुरे, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक यादव, पाटील आदींची ही उपस्थिती होती. महाविद्यालयातील कला, वाणिज्य, बीबीए, बीसीए; या शाखांचे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
उपस्थित काही विद्यार्थिनींनी, विद्यार्थ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांकडे उपस्थित केलेल्या शंका व सूचनांबद्दल पोलीस निरीक्षक हारगुडे यांनी समाधानकारक उत्तरे दिली. प्रा. प्राची कांबळे, प्रा. सुधीर पाटील, प्रा . प्रशांत इनामदार, प्रा. पी. एन. पाटील आदींनी संयोजन केले.
हेही वाचा – खरीप हंगाम ई-पिक पाहणी नोंदणी 15 सप्टेंबरपर्यत पूर्ण करा; तहसीलदार सचिन पाटील












































































