Last Updated on 28 Jun 2025 8:43 PM by Sanjay Patil/Adhorekhit
काटकसरीतून यशाचं गणित; सभासदांना १२ टक्के लाभांश
राजारामबापू बँकेला देशातील पंधराशे नागरी बँकात २० क्रमांक
“स्व. बापूंची दूरदृष्टी आणि अण्णांचं व्यवस्थापन – यशाचं सूत्र
सांगली । स्व.बापूंच्या पाऊलवाटेवरून चालत आपल्या बँकेने देशातील १५०० बँकांमध्ये २० क्रमांक मिळविला आहे. प्रा.शामरावअण्णा व त्यांच्या सहकाऱ्यांनी काटकसर, चोख व पारदर्शी कारभार करीत बँक चालविली आहे आणि हेच आपल्या बँकेच्या यशाचे गमक ठरले आहे, असे गौरवोद्गार माजी मंत्री आ.जयंत पाटील यांनी काढले. इस्लामपूर येथे राजारामबापू सहकारी बँकेच्या ४५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. मध्यंतरी माझ्याकडे बघून काहींनी आपल्या बँकेत दोष शोधण्याचा प्रयत्न केला. ते बिचारे दमले, मात्र त्यांना काही दोष सापडला नाही, अशी टोलाही त्यांनी दिला. यावेळी सभासदांना १२ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला.
राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी.आर. पाटील, माजी अध्यक्ष प्रा.शामराव पाटील, राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील,बँकेचे अध्यक्ष विजयराव यादव, उपाध्यक्ष माणिक पाटील, व्यवस्थापकीय संचालक प्रदीप बाबर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, शामराव वाटेगावकर, विष्णुपंत शिंदे, विनायक पाटील,बी.के.पाटील, रविंद्र बर्डे, शशिकांत पाटील प्रमुख्याने उपस्थित होते. प्रारंभी लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. या सभेत खेळीमेळीत चर्चा होऊन सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले.
आ.पाटील पुढे म्हणाले, काही वेळा एकाच व्यक्तीला किती वर्षे संधी ? अशी चर्चा केली जाते. मात्र सहकारी संस्था एका व्यक्तीच्या, पक्षाच्या नसतात. त्या जनतेच्या मालकीच्या असतात. त्यांच्या विश्वासार्हतेला प्राधान्य देत आपण सर्वच संस्था चालविल्या आहेत. गेल्या २०-२५ वर्षात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि रिझर्व्ह बँकेचे निर्बंध वाढले असताना ही प्रा.शामराव अण्णा व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख व पारदर्शी कारभार करून संस्थेच्या प्रगतीत मोठे योगदान केलेले आहे. देशात अनेक बँका आल्या- गेल्या, काही बुडाल्या, काही बँकात इतके दोष निर्माण झाले की ते सोडविताना त्यांचा बराच काळ गेला. मात्र आपल्या बँकेने संस्थेचा सभासद केंद्रबिंदू मानून कारभार केला आहे. आपल्या बँकेने सांगली,सातारा,कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागास ह पुणे,मुबई मध्येही एक विश्वासाहर्ता निर्माण केली आहे.
अध्यक्ष विजयराव यादव म्हणाले, आजच्या तीव्र स्पर्धेच्या युगातही आपली बँक माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शना खाली यशस्वी वाटचाल करीत आहे. आपण सामाजिक बांधिलकीतून सभासद,कामगारां ना विविध सोई-सुविधा देत आहोत. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्राहकांना चांगल्या सुविधा देत आहोत.
माजी अध्यक्ष प्रा.शामराव पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ते म्हणाले आपल्या बँकेबरोबर देशात २ हजार बँका होत्या,त्यातील ५०० बुडाल्या. आता संपूर्ण देशात कार्यरत १५०० बँकात आपली बँक २० व्या क्रमांकावर आहे. लोकनेते राजारामबापू पाटील यांनी ४४ वर्षांपूर्वी लावलेल्या रोपट्या चा माजी मंत्री आ.जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वटवृक्ष झाल्याचा अभिमान आपणा सर्वांना आहे.
प्रारंभी संचालक सुरेश पाटील यांनी दिवगतांना श्रद्धांजली ठराव मांडला. व्यवस्थापकीय संचालक सीए प्रदीप बाबर यांनी नोटीस वाचन केले. जनरल मॅनेंजर श्रेणीक मगदूम यांनी मागील इतिवृताचे वाचन केले. उपाध्यक्ष माणिकराव पाटील यांनी आभार मानले. संचालिका कमल पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी शाखाधिकारी सचिन खोत, क्लार्क महेश ठोंबरे, शिपाई रोहन माने यांचा उत्कृष्ठ कामगिरीबद्दल सत्कार करण्यात आला. फुरसंगी (पुणे), कचेरी रोड इस्लामपूर, बागणी व राजवाडा चौक सांगली या शाखांचा अनुक्रमे एक ते पाचप्रमाणे सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी बाळासाहेब पाटील ,सुस्मिता जाधव, संजय पाटील, दादासाहेब पाटील, रणजित पाटील, विठ्ठल पाटील, प्राचार्या दीपा देशपांडे, सुनीता देशमाने, पुष्पलता खरात, युवराज सुर्यवंशी, मुनीर पटवेकर, सुभाषराव सुर्यवंशी, देवराज देशमुख, आर.एस.जाखले यांच्यासह अनेक मान्यवर, बँकेचे संचालक, सभासद व अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.
प्रामाणिक कामाचा खास सन्मान
आ.पाटील यांनी आपल्या भाषणात प्रा.शामराव पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांच्या कामाचे कौतुक करीत आपल्या भाषणाच्या शेवटी त्यांचा खास सत्कार करण्याची सूचना केली. यावेळी मावळते अध्यक्ष प्रा.शामराव पाटील,कार्यकारी संचालक आर.एस. जाखले,चिफ जनरल मॅनेंजर आर.ए.पाटील यांचा खास सत्कार करण्यात आला.













































































