Last Updated on 14 Nov 2022 7:41 AM by Sanjay Patil/Adhorekhit
बालदिन । इस्लामपुरात पारंपरिक खेळांना उजाळा
सांगली । मोबाईल मध्ये हरवलेल्या बालपणात पारंपरिक खेळांना पुन्हा समोर आणण्यासाठी मुक्तांगण प्ले स्कूलमध्ये विविध खेळ घेतले गेले. बालदिनाच्या निमित्ताने जुन्या खेळांच्या आठवणींना उजाळा मिळाला. चिमुकली मुलं विटी-दांडू,लंगडी,रस्सीखेच, भोवरा, जिबल्यासह विविध खेळ मनसोक्त खेळले गेले.

इस्लामपूर येथील मुक्तांगण प्ले स्कूलच्या आवारात विविध खेळांत मुलं रमली. गेली १२ वर्षे खेळातून आणि अनुभवातून शिक्षण देत मुक्तांगण मध्ये मुलांचे व्यक्तीमत्व घडवले जाते. नुकत्याच दिवाळीच्या सुट्या संपल्या. सुट्टीत मुलं खेळतांना किती दिसली ?
मुलांना हे जुने खेळ माहीत व्हावेत म्हणून मुक्तांगण मध्ये मुलांना खेळ खेळून दाखवण्यात आले. यात मुलांचाही सहभाग होता.

छोटे छोटे गट तयार करून बिट्यांचा व खड्याचा खेळ खेळला गेला. खडे एका हाताने उंच टाकून कसे काय झेलता येतात याचे निरीक्षण मुलांनी केले.विटी-दांडू,लंगडी, रस्सीखेच खेळली. लंगडी, जिबल्या, तळ्यात- मळ्यात,दोर-उड्या आदी खेळ मनसोक्त खेळले गेले.
जुने टायर टांगून त्याचा झोपळा खेळला गेला. तर खाली टायर टाकून मुलांनी त्यातून उड्या मारल्या.तर काही मुलांनी हाताने टायर फिरवले.
![]()
सध्या बाल शाळेत मोबाईलच्या आहारी गेलेल्या मुलांची संख्या वाढती आहे.हल्ली मुलांच्या स्पर्शाची जागा मोबाईलने घेतली आहे. मुलांच्या सोबत खेळायला कोणी नाही हे कारण सांगत पालक मुलांच्या ताब्यात मोबाईल देत आहेत. घरातच बसून मोबाईल गेम खेळण्यातच लहानमुले दंग आहेत.हे चित्र बदलण्यासाठी आम्ही पारंपरिक जुने खेळ घेतले. यातून मुलांच्या व्यक्तीमत्वात नक्की बदल घडेल असा प्रयत्न आहे.
सौ. वर्षाराणी मोहिते
संचालिका मुक्तांगण प्ले स्कूल
![]()
आजींनी दिला जुन्या खेळांच्या आठवणींना उजाळा..!
जुन्या आठवणींना उजाळा देत साठ वर्षाच्या श्रीमती सोनाबाई पांडूरंग पाटील या आजीने भोवरा खेळून दाखवला.तर जुने खेळ खेळत सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सरोजनी मोहिते यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणारा खेळ घेतला.आजींनी जादूचा चेंडू दाखवत मज्जा-मस्ती आणि धम्माल केली.

![]()










































































