Last Updated on 26 Sep 2021 6:48 PM by Sanjay Patil/Adhorekhit
आंध्र प्रदेशसह ओडिशा किनारपट्टीला हाय अलर्ट, महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता
नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘गुलाब’ चक्रीवादळ आंध्रप्रदेशच्या उत्तरेकडील आणि ओडिशाच्या दक्षिण किनारपट्टीवर धडकले असून, वादळाच्या तडाख्यात सापडून आंध्रातील पाच मासेमार बुडाल्याचे वृत्त आहे. स्थितीचे गांभीर्य लक्षात घेता एनडीआरएफची चमू तैनात करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील भागांनाही अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला शनिवारी दुपारी कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. त्याचे रुपांतर चक्रीवादळात झाले आहे. विशाखापट्टणम् आणि गोपालपूर या दरम्यान असलेल्या कलिंगपट्टणम् या ठिकाणी सायंकाळपर्यंत गुलाब चक्रीवादळ पोहोचण्याची शक्यता असल्याचे भारतीय हवामान खात्याने म्हटले होते. त्यानुसार सायंकाळी सहा वाजतापासूनच वारे घोंघावण्यास सुरुवात झाली होती. कलिंगपट्टणम् आणि गोपालपूरदरम्यान या वादळाचा प्रकोप दिसून आला. वार्याचा वेग इतका प्रचंड होता की, आंध्रच्या श्रीकाकुलम्चे पाच मासेमार परतीच्या प्रवासात असताना समुद्रात बुडाले. पोलिसांच्या मदतीने त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. दोन्ही राज्यांच्या किनारपट्टीलगत राहणार्या हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
पंतप्रधान मोदींनी घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशा आणि आंध्रच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली तसेच वादळामुळे निर्माण झालेल्या स्थितीचा आढावा घेतला. मोदींनी दोन्ही मुख्यमंत्र्यांना या स्थितीत आवश्यक ती सर्व मदत करण्याचेही आश्वासन दिले आहे.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
“ओदिशाच्या काही भागातील चक्रीवादळाच्या परिस्थितीबाबत मुख्यमंत्री @Naveen_Odisha यांच्याशी चर्चा केली. या संकटांवर मात करण्यासाठी केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. सर्वांच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी प्रार्थना करतो. .”
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
“आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगन मोहन रेड्डी यांच्याशी बोललो आणि गुलाब चक्रीवादळच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. केंद्राकडून शक्य ती सर्व मदत पुरवण्याचे आश्वासन दिले. मी प्रत्येकाच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी प्रार्थना करतो.”
महाराष्ट्रातही परिणाम जाणवणार
या चक्रीवादळाचा परिणाम राज्यावर देखील होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांसह मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज असल्याने हवामान खात्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
प्रादेशिक हवामान विभाग आयएमडी मुंबईच्या हवामान अधिकारी शुभांगी भुते यांनी सांगितले की, पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबासह राजस्थान आणि छत्तीसगडवर घोंघावत असलेल्या चक्रीवादळासारखी परिस्थिती मुंबई, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रावरही परिणाम करू शकते. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मान्सूनचा परिणाम राज्यावर दिसून येईल. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर, काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसाची तीव्रता २६ सप्टेंबर ते २९ सप्टेंबरपर्यंत राहील.









































































