Last Updated on 17 Jun 2020 3:53 PM by
१५.७२ कोटी रुपये खात्यावर : हे मानधन थेट त्यांच्या बँक खात्यांवर जमा
मुंबई : राज्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचांबरोबर आता उपसरपंचांनाही दरमहा मानधन देण्यात येणार आहे.आतापर्यंत फक्त सरपंचांना मानधन देण्यात येत होते,त्यात उपसरपंचांचा समावेश नव्हता.पण आता सरपंचांप्रमाणे उपसरपंचांनाही मानधन सुरु करण्यात आले असून पहिल्या टप्प्यात १५.७२ कोटी रुपयांची रक्कम उपसरपंचांच्या बँक खात्यांवर जमा करण्यात आली असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
हसन मुश्रीफ म्हणाले,राज्यातील गावांच्या विकासासाठी सरपंचांबरोबर उपसरपंचांचेही मोठे योगदान असते. सध्या राज्यातील सरपंचांना दरमहा मानधन मिळत आहे. पण गावाच्या विकासात महत्त्वाचा सहभाग देणाऱ्या उपसरपंचांचे योगदान लक्षात घेऊन त्यांनाही मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु काही तांत्रिक कारणास्तव आतापर्यंत त्यांना मानधन देता आले नव्हते. आता मानधन ऑनलाईन देण्याची कार्यप्रणाली तयार करण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे उपसरपंचांना एकूण 8 महिन्यांचे एकत्रित मानधन थेट त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे. एकुण १५.७२ कोटी रुपये खात्यावर जमा करण्यात आले आहेत.
राज्यात सुमारे २८ हजार ग्रामपंचायती असून त्यातील ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण केलेल्या २४ हजार ४८५ ग्रामपंचायतींच्या उपसरपंचांच्या खात्यावर सध्या मानधन जमा झाले आहे. उर्वरित उपसरपंचांच्या खात्यावर मानधन जमा करण्याची कार्यवाही सुरु असून ती लवकरच पूर्ण केली जाईल, अशी माहिती मंत्री मुश्रीफ यांनी दिली.
असे असेल मानधनाचे स्वरुप
२००० पर्यंत लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या उपसरपंचांना दरमहा १००० रुपये
२००१ ते ८००० पर्यंत लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या उपसरपंचांना दरमहा १५०० रुपये
८००१ पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या उपसरपंचांना दरमहा २००० रुपये
सरपंचांनाही मिळाले प्रलंबित मानधन
दरम्यान, राज्यातील सरपंचांचे काही महिन्यांचे मानधन प्रलंबित राहीले होते. हे मानधन तातडीने अदा करण्यात यावे, अशा सूचना विभागास दिल्या होत्या. त्यानुसार कार्यवाही करुन विभागामार्फत प्रलंबित मानधनापोटी सरपंचांच्या खात्यावर नुकतेच २२ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत, अशी माहितीही मंत्री मुश्रीफ यांनी दिली.














































































