Last Updated on 22 Mar 2025 3:00 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली : वाळवा तालुक्यातील हुबालवाडी हे आता ‘अधिकाऱ्यांचे गाव’ म्हणून ओळखले जात आहे. या गावातील अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमधून शासकीय सेवेत आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत. गावातील शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत सातत्याने झळकत आहेत आणि प्रशासनातील विविध पदांवर आपली ठसा उमटवत आहेत. नुकत्याच झालेल्या एमपीएससी परीक्षेत गावातील चार विद्यार्थ्यांची निवड झाली असून, त्यातील तिघे महसूल सहाय्यकपदी तर एक मुंबई पोलीस दलात रुजू होणार आहे.
कृषिप्रधान गाव असलेल्या हुबालवाडीतील तरुणाई मात्र आता केवळ शेतीपुरती मर्यादित राहिलेली नाही. चांगल्या शिक्षणाची आस, उत्तम मार्गदर्शन आणि जबरदस्त मेहनत यांच्या जोरावर गावाने स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात नवा आदर्श निर्माण केला आहे. गावातील सागर सुकुमार हुबाले, श्वेताराणी विलास हुबाले, वैष्णवी आबासो हुबाले यांची महसूल सहाय्यक म्हणून निवड झाली असून, दिग्विजय दिलीप काळे याने मुंबई पोलिस दलात स्थान मिळवले आहे.
बौद्धिक क्षमतेची चुणूक!
केवळ दोन-अडीच हजार लोकसंख्येच्या या गावात पारंपरिक शेतीवर आधारित अर्थव्यवस्था असूनही विद्यार्थ्यांचा ओढा स्पर्धा परीक्षांकडे वाढत आहे. गावातील पालक मुलांच्या शिक्षणासाठी विशेष प्रयत्न करत असून, उत्तम अभ्यासिका, चांगले मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांची मेहनत यामुळे गावातील बौद्धिक क्षमतेत लक्षणीय वाढ झाली आहे. परिणामी, गेल्या दहा वर्षांत डझनभर विद्यार्थी शासकीय सेवेत रुजू झाले आहेत.
यशस्वी अधिकाऱ्यांची परंपरा
या गावात स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्याची परंपराच तयार झाली आहे. मागील काही वर्षांत डझनभर विद्यार्थ्यांनी विविध शासकीय पदांवर स्थान मिळवले असून, यात काही जण उच्च पदांवर कार्यरत आहेत. त्यात, संतोष गावडे (उपसचिव, मंत्रालय), नीलम पवार (डीवायएसपी), धनश्री पवार, विशाल पवार, रितेश माळी (पीएसआय), स्वाती हुबाले, महानंदा हुबाले (क्लास वन मेडिकल ऑफिसर), विशाल नांगरे, संदीप हुबाले (महसूल सहाय्यक), मनीषा फुलारे (ज्यु. क्लर्क, जिल्हा सत्र न्यायालय), गणेश हुबाले, दशरथ फुलारे (तलाठी) यांसह अनेकजण पोलीस, आर्मी ऑफिसर, शिक्षक आणि विविध शासकीय पदांवर कार्यरत आहेत.
हुबालवाडीचा आदर्श इतरांसाठी प्रेरणादायक!
एका छोट्याशा गावातून विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत मोठे यश मिळवणे ही केवळ जिद्द आणि कठोर परिश्रमांची कमाल आहे. गेल्या काही वर्षांत या गावाने स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्याची नवी ओळख निर्माण केली आहे. बुद्धिमत्ता आणि मेहनतीच्या जोरावर जिल्ह्यातील हे छोटेसे गाव आता अधिकाऱ्यांचे गाव म्हणून नावारूपास येत आहे.









































































