Last Updated on 30 Jul 2025 8:58 AM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची सद्या जोरदार तयारी सुरु आहे.प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून बनविलेल्या मूर्तीमुळे होणारे वाढते जलप्रदूषण थांबविण्यासाठी शाडूच्या गणेश मूर्तीला चांगलेच महत्व प्राप्त झाले असून शाडूपासून बनविलेल्या गणेश मूर्ती घेण्याकडे भक्तांचा कल वाढला आहे. सध्या गणेश मूर्तीचे रंगकाम करण्यात कारागीर मग्न आहेत.
सार्वजनिक गणेश मंडळाच्या मोठ्या मूर्तींची बुकिंग सुरू झाली आहे. स्थानिक मूर्तिकारांबरोबरच पेण, मुंबई, पुणे, सोलापूर, कोल्हापूर येथूनही गणेश मुर्ती विक्रीसाठी आणल्या जात होत्या. पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला असताना गणेश उत्सवात ‘श्रीं’च्या प्रतिष्ठापणेसाठी प्लॅस्टर ऑफ पॅरिसऐवजी शाडूच्या ‘इको फ्रेंडली’ मूर्तींना मागणी दिवसेंदिवस वाढू लागली आहे. राज्यात कोल्हापूर, इस्लामपुर, तसेच बहेसह अन्य काही मोजक्या गावांचा अपवाद वगळता सर्वत्र प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती तयार केल्या जातात.

पूर्णपणे ब्राऊन (तपकिरी) तसेच शुभ्र रंगातील गणेश मूर्तीना वाढती मागणी असल्याचे मूर्तिकार नारायण कुंभार यांनी सांगितले. शाडूच्या लहान मूर्ती साधारण ७५० रुपये तर मोठ्या मूर्तींची किंमत सुमारे पाच हजारांपर्यंत आहे.
‘दगडूशेठ’ आणि ‘लालबागचा राजा’ या मूर्ती एव्हरग्रीन आहेत आणि याच मूर्तीना ग्राहकांकडून जास्त प्रमाणात मागणी आहे. साईबाबा रुपात, स्वामी समर्थ, लालबाग, सनातन, बजाप,चिंतामणी, महाराज, बाल गणपती, पाटील, विठ्ठल मूर्ती, ज्ञानेश्वरी या शाडूच्या मातीपासून बनवलेल्या मूर्तींनाही मागणी आहे. गणपतीच्या विविध रूपातील मराठमोळ्या रूपातील वस्त्र परिधान केलेल्या आकर्षक व सुबक गणेश मूर्ती सध्या सर्वांचे आकर्षण आहे. साधारणतः एक फुटांपासून तीन फुटापर्यंत शाडूच्या मुर्ती उपलब्ध असल्याचे मुळचे बहे येथील आणि सद्या इस्लामपुर येथील पोलीस लाइनच्या मागील बाजूस वास्तव्यास असलेले मूर्तिकार नारायण कुंभार यांनी सांगितले.

सध्या गणेश मूर्तींचे रंगकाम सुरु आहे. मूर्तिकार कुंभार यांनी गेल्या अनेक वर्षांपासून शाडूच्या ‘इको फ्रेंडली’ गणेश मूर्ती बनवून वेगळेपण दाखवले आहे.कुंभार यांना गणेशमूर्ती तयार करणे, रंगकाम करणे आदी कामात त्यांच्या पत्नी उमाताई, मुलगा प्रवीण, सून सौ.सारिका कुंभार तसेच भीमराव सुतार, सौ. माधुरी दाभाडे, सौ. पूनम दाभाडे, सौ. नलिनी पंडित, सौ. नंदाताई कांबळे हे देखील मदत करत असतात.

या मूर्तीना वापरण्यात येणारे रंग हे नैसर्गिक व केमिकल विरहित असल्याने विसर्जनानंतर शाडूच्या मूर्ती बरोबरच रंगही जलाशयात विरघळत असल्याने यापासून जल प्रदुषण होत नाही. पीओपीच्या गणेशमूर्ती या विसर्जनानंतर महिना-महिना पाण्यात तशाच उभ्या असतात, आणि त्याला आकर्षक दिसण्यासाठी दिलेले केमिकल पासून बनविलेले रंगही जल प्रदूषणाचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण करण्यास कारणीभूत असल्याचे मूर्तिकार नारायण कुंभार यांनी सांगितले.













































































