Last Updated on 02 Aug 2025 9:38 AM by Sanjay Patil/Adhorekhit
कोल्हापूर। मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे नोटिफिकेशन जारी करण्यात आलं असून येत्या 18 ऑगस्टपासून सर्किट बेंचचं काम सुरू होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तींकडून 1 ऑगस्ट रोजी याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. यामुळे कोल्हापूर, सांगलीसह सहा जिल्ह्यांच्या 40 वर्षांच्या लढ्याला यश मिळाले आहे.
कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सोलापूर या सहा जिल्ह्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ, सर्किट बेंच कोल्हापूर मध्ये स्थापन करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या चार दशकापासून कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधूदुर्ग येथील वकील खंडपीठ कृती समितीच्या माध्यमातून लढा देत होते. कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनसह विविध सामाजिक संघटनांनी आणि राजकीय नेत्यांनी वेळोवेळी आंदोलने, मोर्चे आणि शासनाकडे अथक पाठपुरावा केला होता. या सर्व प्रयत्नांना आणि संघर्षाला आज यश आले आहे.














































































