Last Updated on 11 Nov 2021 12:36 AM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली ।
केंद्र सरकारने आपली सर्व आरोग्य केंद्रे डिजिटल माध्यमातून जोडण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत,केंद्रातील सर्व रुग्णालये,प्रयोगशाळा,फार्मसी आणि रेडिओलॉजी आरोग्य केंद्रांची डिजिटल आरोग्य सुविधा रजिस्ट्रीमध्ये नोंदणी केली जाणार आहे.यामध्ये काम करणाऱ्या सर्व कायमस्वरूपी आणि तात्पुरत्या डॉक्टरांचीही नोंदणी केली जाणार आहे.या व्यवस्थेनंतर येथे होणाऱ्या सर्व कामांचा डिजिटल तपशील उपलब्ध होणार आहे.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी केंद्र सरकारच्या सर्व विभागांचे सचिव आणि रुग्णालयांच्या संचालकांना याबाबत पत्र लिहिले आहे.या पत्रात सर्व आरोग्य सेवा लवकरात लवकर डिजिटल माध्यमात आणण्यास सांगण्यात आले आहे.आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले की,आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे.27 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अभियानाची सुरुवात केली.
या प्रणालीअंतर्गत,एनआयसी (नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर) ने रुग्णालये आणि रुग्णांचे डिजिटल रेकॉर्ड ठेवण्यासाठी ‘ई सुश्रुता’ नावाचे सॉफ्टवेअर विकसित केले आहे. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे डॉ. प्रवीण गायदान यांची मिशन डायरेक्टर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य संस्थांसोबतच, राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणही आपली रुग्णालये डिजिटल माध्यमात आणण्यासाठी राज्य सरकारांशी चर्चा करत आहे.














































































